विदर्भातील 5,077 ग्राहकांना महावितरणचे अभय

0
43
नागपूर, दि. 28 सप्टेंबर:- थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेचा विदर्भात पहिल्या 27 दिवसांत 6,490 ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली असून त्यापैकी 5,077 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत  यांनी केले आहे.
संपूर्ण विदर्भाचा विचार करता अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 5 कोटी 76 लाख रुपये भरले आहेत. विदर्भात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1,216 ग्राहकांनी योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. त्या खालोखाल बुलढाणा जिल्हा (818 ग्राहक), गडचिरोली (549 ग्राहक), वाशिम (355 ग्राहक), चंद्र्पूर (358 ग्राहक), यवतमाळ (340 ग्राहक), अकोला (347 ग्राहक),  अमरावती (340 ग्राहक), वर्धा (247 ग्राहक), भंडारा (200 ग्राहक) आणि गोंदिया (307 ग्राहक)  यांचा क्रम लागतो. अर्ज करणा-या 6,490 ग्राहकांपैकी 3,333 ग्राहकांनी पुनर्जोडणीसाठी तर 1,212 ग्राहकानी नवीन वीज जोडणी घेण्याची इच्छा जाहीर केली आहे.
नागपूर शहर व नागपूर ग्रामीण या महावितरणच्या दोन मंडळांमधील अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या 1,216 ग्राहकांपैकी 1,115 ग्राहकांनी एक रकमी भरणा करणे पसंत केले. केवळ 101 ग्राहकांनी तीस टक्के रक्कम भरून बाकी सहा हफ्त्यात भरण्याचा पर्याय निवडला. या ग्राहकांकडून महावितरणला 2 कोटी 43 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. विदर्भातील जमा झालेल्या एकूण रकमेपैकी सुमारे 47 टक्के रक्कम एकट्या नागपूर परिमंडलात जमा झाली आहे.
त्यांनी सांगितले की, महावितरणने 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी वीज ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. त्यानुसार बिलाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांना देयकाची मूळ रक्कम भरल्यास व्याज व विलंब आकार माफ करण्यात येत आहे. ग्राहकांनी थकीत बिलाचा भरणा एक रकमी केल्यास लघुदाब ग्राहकांना 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सवलत मिळते. मूळ देयकाच्या 30 टक्के रक्कम भरून उरलेली रक्कम सहा हप्त्यात भरायचीही सोय आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना त्वरित वीज जोडणी मिळते. कृषी ग्राहक वगळता इतर वीज ग्राहकांना ही योजना लागू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकबाकीपोटी जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. तथापि, थेट कारवाई करण्याच्या ऐवजी वीज ग्राहकांना एक संधी देण्यासाठी महावितरणने अभय योजना लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेली घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर जागा थकबाकीमुक्त करण्याची संधी महावितरणच्या अभय योजना 2024 मध्ये उपलब्ध झाली आहे. बिलाच्या थकबाकीबद्दल महावितरण कायदेशीर कारवाई करू शकते. वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त व्हायची ही सुवर्णसंधी असल्याने थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले आहे.