माझी वसुंधरा अभियानात प्रत्येकी राज्यस्तरीय 50-50 लाखाची बक्षिसे!
गोंदिया: माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सालेकसा तालुक्यातील भजेपार तथा सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 50-50 लाख रुपयांची राज्यस्तरीय उत्तेजनार्थ बक्षिसे घोषित केली आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्याचा मान राज्यात वाढला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी मागील चार वर्षापासून राज्य शासनाच्या वातावरणीय बदल विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. राज्यभरातील हजारो ग्राम पंचायती, नगर परिषद, महानगर पालिका यामध्ये वेगवेगळ्या लोकसंख्या गट निहाय ही स्पर्धा असते. जल, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश या पंच तत्त्वावर आधारित ही मोहीम पर्यावरण संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरत आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी व्यापक जनजागृती, विविध उपक्रम यांतर्गत राबविले जातात.
स्वच्छ सर्वेक्षण 2023-24 मध्ये जिल्ह्यातील भजेपार आणि डव्वा ग्राम पंचायतीनी वर्षभर जनजागृती, विविध पर्यावरण पूरक उपक्रम, इको फ्रेंडली सण उत्सव आदि कामातून हे यश संपादन केले आहे. दोन्ही ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय उत्तेजनार्थ 50- 50 लाख रुपयांची बक्षिसे देऊन मुख्य मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कामगिरीबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर यांनी अभिनंदन केले आहे.
बॉक्स….
गावकऱ्यांच्या परिश्रमाला हा पुरस्कार समर्पित
निसर्गाच्या रक्षणासाठी आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी वर्षभर सतत उपक्रम राबविले. या उपक्रमांना समस्त ग्रामस्थांनी जीवाचे रान करून भर भरून प्रतिसाद दिला. त्यांचे परिश्रम जिद्द चिकाटी आणि एकोपा यामुळेच हा राज्य स्तरीय सन्मान प्राप्त झाला आहे. त्यामुळे याचे खरे शिलेदार माझे जागरुक ग्रामस्थ आहेत. अभियानाचे नागपूर विभागीय कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती येथून वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले या सर्व घटकांचे आभार. या पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यात पुन्हा जिद्दीने कामाला लागू.-चंद्रकुमार बहेकार, सरपंच भजेपार
गावकऱ्यांच्या मेहनतीचे चीज झाले
माझी वसुंधरा अभियान राबविण्यासाठी वर्षभर गावकरी बांधवांची साथ मिळाली. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले. ग्रामपंचायत मधील माझे सर्व सहकारी, ग्रामस्थ त्याच प्रमाणे प्रशासनाचे जाहीर आभार. पहिल्यांदाच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त होत असल्याने अत्यानंद झाला आहे.-योगेश्वरी चौधरी, सरपंच डव्वा