गोंदिया,दि.२९ : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमसरमध्ये आले होते. सभेला गर्दी झाली, मात्र ही गर्दी भाडोत्री असल्याचे सभा संपल्यानंतर समोर आले. सभा संपल्यानंतर पुरुषांना पैसे वाटप करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला. दुसरीकडे, महिलांना १५०० रुपये आणि स्टीलचे डबे देणार असल्याचे सांगून सभेसाठी आणण्यात आले होते, मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागल्यामुळे महिलांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
तुमसर येथील नेहरू क्रीडांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनसन्मान यात्रेनिमित जनसभा आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार येणार म्हणून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. भव्यदिव्य सभामंडप उभारण्यात आला. या कार्यक्रमासाठी ३० ते ३५ हजार लोकांची गर्दी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू कारेमोरे यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. त्याप्रमाणे कार्यक्रमाला गर्दीसुद्धा झाली, त्यातही महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळेच गुलाबी फेट्यातल्या ‘लाडक्या बहिणींचे’ कौतुक खुद्द अजित पवारांनी केले. मात्र सभा संपताच या लाडक्या बहिणी आयोजकांच्या नावाने बोटे मोडू लागल्या. कारण या लाडक्या बहिणींना १५०० रुपये आणि स्टीलचा डबा देण्याचे आश्वासन देऊन कार्यक्रमासाठी आणण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमानंतर काही महिलांची ५०० रुपयांवर बोळवण करण्यात आली तर काहींना रिकाम्या हाती परतावे लागले. यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला.
सभा संपल्यानंतर पुरुषांना पैसे वाटप करतानाचा व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर प्रसारित झाला. काहींना वस्तू वाटप करण्यात येत असल्याचेही या व्हीडिओत दिसत आहे. सभेच्या ठिकाणी जमलेल्या पुरुषांना बाहेर पडताना काही लोक पैसे वाटप करीत आहेत. हा प्रकार समोर येताच काही वॉट्सॲप ग्रुपवर राजू कारेमोरे समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. राजकीय कार्यक्रमांना गर्दी करण्यासाठी महिला-पुरुषांना भाड्याने आणले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.