नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत सण-उत्सव साजरे करा- डॉ. किरण पाटील

0
19
सर्व यंत्रणांनी समन्वय ठेऊन उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
बुलडाणा,दि. 1: येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यात विविध सण आणि उत्सव साजरे होणार असून नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखत सर्व सण व उत्सव साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केले. तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेऊन उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित समन्वय समितीच्या बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी पोलिस मुख्य कार्यकारी अधिकिारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक भगवान महामुने तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस निरिक्षक, तहसिलदार, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, आपल्या जिल्ह्याला सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. हा नावलौकीक कायम राखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुया. नवरात्र उत्सव दरम्यान नागरिकांना कुठलीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या अडचणीचे तातडीने निवारण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. दुर्गादेवी विसर्जन नदी किंवा तलावात न करता कृत्रिम हौदातच करावे. विसर्जनाच्या ठिकाणी फिरते स्वच्छ्ता गृह आणि अग्निशामक यंत्रणा ठेवावी. ग्राम पंचायत आणि नगर पालिकेने आपल्या हद्दीतील अवैध अतिक्रमणे तात्काळ काढून टाकावीत. तसेच सण कालावधीत मास विक्री व मद्य विक्री करू नये असे आदेश काढावेत. ग्राम पंचायत आणि नगरपालिका यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने हाती घ्यावी, संबधित विभागाने आपले अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी पूर्ण करावित. कुठेही वाहतुक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. सदैव विद्युत वितरण विभाग कार्यान्वीत राहील यादृष्टीने पूर्व नियोजन करावे, दुरध्वनी व्यवस्था सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी, आदी सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की, सर्व शासकीय अशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा. तसेच नागरिकांनी सर्व धर्माचा आदर राखत सर्व सन व उत्सव शांततेत साजरे करावेत. कोणत्याही प्रकारचे समाज विघातक कृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही अनुचित घटना घडत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ पोलिसांना कळवावे.