नागपूर : केंद्रशासीत प्रदेश, सर्व राज्य आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून उल्लेखनीय कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट तपास यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक पुरस्कार देण्यात येतो. नागपूर शहर पोलीस दलात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक रेखा सागर संकपाळ यांना या वर्षीचे सर्वोत्कृष्ट तपासासाठी हे पदक जाहीर झाले. त्यांनी बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर राज्यातील पहिला मकोका गुन्हा दाखल केला होता. बाळविक्री प्रकरणी तब्बल १० टोळ्यांचा उलगडा करीत ९१ आरोपींवर गुन्हा दाखल केला होता, हे विशेष.
प्रत्येक राज्यातील पोलीस आणि अन्य तपास यंत्रणांकडून सर्वोत्कृष्ट तपास आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून घेण्यात येते. प्रत्येक राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना यामध्ये सहभागी करण्यात येते. केंद्रीय दक्षता पदक पुरस्कारासाठी देशभरातून हजारो नामांकन केले जाते. त्यामधून सर्वोत्कृष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय दक्षता पदक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे सीआयडी विभागात पोलीस उपाधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या रेखा संकपाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पंकज चक्रे यांचा समावेश आहे. यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलातील तब्बल ३० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षता पदके मिळाली आहेत. त्यामध्ये पोलीस उपाधीक्षक रेखा संकपाळ यांच्यासह पोलीस निरीक्षक शंकर शेळके, सहायक निरीक्षक सिध्देश जोष्टे, उपनिरीक्षक राधिका भावसार, पोलीस निरीक्षक समीर लोणकर, सहायक निरीक्षक मनोज चौधरी, सहायक निरीक्षक विवेकानंद पाटील, सहायक निरीक्षक उमेश बोरसे आण सहायक निरीक्षक ऋषिकेश रवाळे यांचाही पदकांच्या यादीत समावेश आहे.