रक्तदान करून थॅलेसेमियाग्रस्त मुलीचे प्राण वाचवले

0
166

गोंदिया,दि.०४ः थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या तिरोडा येथील समिक्षा राघोटे या मुलीला वेळोवेळी रक्ताची गरज भासते. या आजारात रुग्णाला नियमित रक्त देणे आवश्यक असते.अन्यथा त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. समिक्षाच नाही तर तिच्या कुटुंबातील तिन्ही मुले या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तिचे वडील एस.एम. राघोटे यांना मुलांसाठी सतत रक्तपुरवठा व्यवस्थित करण्यात प्रचंड अडचणी येतात.
सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने वेळेवर रक्त मिळणे हे मोठे आव्हान बनले आहे. या कठीण काळात राघोटे कुटुंबीयांनी रक्तमित्र विनोद चंदवानी (गुड्डू) यांच्याशी संपर्क साधून मुलीला ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच विनोद चंदवानी (गुड्डू) यांनी त्यांच्या नियमित रक्तदात्याच्या यादीतून गणेश चौरागडे यांच्याशी संपर्क साधला. गणेशने तातडीने लोकमान्य रक्तपेढी गाठली आणि मुलीसाठी रक्तदान करून आपले माणुसकीचे कर्तव्य पार पाडले.
या उदात्त कार्याबद्दल रक्तमित्र विनोद चंदवाणी (गुड्डू) यांनी गणेश चौरागडे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. या स्तुत्य कार्याबद्दल राघोटे परिवाराने गणेश चौरागडे व विनोद चांदवानी (गुड्डू) यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.