चितळाच्या शिकारप्रकरणी आरोपी अटकेत

0
9

गडचिरोली,दि.13- जिल्ह्यातील चामोर्शी वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ३६० मधील वाकडी लगतच्या परिसरात चितळाची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावणार्‍या दोन आरोपींना वनाधिकार्‍यांनी अटक केली. राजू नामदेव मडावी, दशरथ भगवान काकडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चितळाची शिकार करून वाकडी गावात त्याच्या मांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची गुप्त माहिती चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी के. आर. धोडणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या सहकारी कर्मचार्‍यांसह वाकडी गावात जाऊन राजू मडावी व दशरथ काकडे यांच्या घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता, चितळाचे मांस आढळले. त्यानंतर आरोपींनी सांगितलेल्या प्रत्यक्ष शिकारीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पंचनामा करून शिकार करणार्‍या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.