महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलाचा स्लॅब दबला

0
10

चंद्रपूर,दि.14- महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा गोंडपिपरीनजीकचा बहुचर्चित पोडसा पुलाच्या स्लॅब खाली दबल्याने या पुलावरून होणारी जड वाहतूकीला संभाव्य धोका बघता बांधकाम विभागाने तात्पुरती बंदी घातली आहे. बंदीसंदर्भात महाराष्ट्र-तेलंगणातील पोलीस विभागाला सुचना देणार असून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचे फलक लावणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
सन २0१0 च्या महापुरात बहुचर्चित पोडसा पुलाचा एक स्लॅब खाली दबला होता. बांधकाम विभागाने पाहणी करून कंत्राटदाराला दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र कंत्राटदाराने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. गोंडपिपरी तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. त्यात वर्धा नदीवर असलेल्या धरणातील पाणी सोडल्याने नदी काठावरील गावांना पुराचा मोठा फटका बसला. नदी काठावरील शेकडो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली आहे. एकीकडे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला असताना करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुलही पुराच्या तडाख्याने क्षतिग्रस्त झाला आहे.
सन २0१0 पेक्षा पुलाचा स्लॅब मोठय़ा फरकाने दबला आहे. पुलावरून दोन राज्यातील प्रवासी वाहतूक, जड वाहतुकीतून दळणवळण सुरू असते. दबलेल्या स्लॅबमुळे संभाव्य धोका लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभाग गोंडपिपरीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुलाची पाहणी करून जडवाहतुकीला आळा घालण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत दोन्ही राज्यातील पोलीस ठाण्याला पत्र देवून पुलाच्या दोन्ही सीमेवर बंदीचा फलक लावणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.