शिक्षकांसाठी शिवसेनेचे आमरण उपोषण

0
39

भंडारा,दि.14 : कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांच्या मागण्याची पुर्तता करण्यात आली नसल्याने राज्यभर आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेने दिला. त्यानंतर भंडारा येथील जिल्हा परिषदेसमोर मंगळवारपासून आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला आहे.तसेच दोन दिवसात मागण्या मान्य केल्यास आंदोलनाचे रुप बदलू शकते असा इशाराही पटले यांनी दिला.
उपोषणात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची उपस्थिती आहे. शासन निर्णयानुसार कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात तीन वर्षासाठी अतिथी निदेशक म्हणून करण्यात आली. वर्ग ६ ते ८ वीची विद्यार्थी संख्या १00 पेक्षा कमी असता कामा नये, असे झाल्यास सेवा समाप्त किंवा मानधन मिळणार नाही, असे नमूद आहे. आठवड्याच्या तासीका १२ व महिन्यांचे २,५00 रूपये करण्यात आले आहे. परंतु हा आदेश कला व क्रीडा, कार्यानुभव, निदेशकांच्या हिताचा नाही. त्यामुळे न्याय हक्कासाठी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपात अतिथी निदेशक म्हणून न करता कायम स्वरूपी घेण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. उपोषणाला माजी आ. नरेंद्र भोंडेकर, वसंत ऐंचिलवार, रवि चांदेवार, नरेश करंजेकर, अनिल गायधने, अरविंद बनकर, विश्‍वनाथ चांदेवार, वैजयंती गभने, ज्योत्सना खोब्रागडे आदींचा समावेश आहे.