जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे लेखणीबंद आंदोलन आजपासून

0
11

भंडारा : जिल्हा परिषद मध्ये कार्यरत लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांवर वेतन आयोगाचा तफावतीचा अन्याय होत आहे. यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उद्या गुरुवारपासून राज्यभरात लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. यात जिल्ह्यातील ३८१ कर्मचारी सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने हे लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष प्रभू मते यांनी दिली.
ते म्हणाले, लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतनश्रेणीचा तिढा १९८६ पासून प्रलंबित असल्याचे सांगितले. याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र शासनाकडून त्याची योग्य दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या चौथ्या वेतन आयोगाचा तफावतीचा फटका आतापर्यंत लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांना सहन करावा लागत आहे. अन्य विभागाच्या लिपीकवर्गीय कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या तुलनेत त्यांच्या वेतनात सुमारे १0 ते १५ हजार रुपयांची तफावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बेमुदत लेखणीबंद आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पत्रपरिषदेला जिल्हा कार्याध्यक्ष मनिष वाहाणे, यशवंत दुनेदार, भागवत मदनकर, दिलीप सोनुले, नितेश गावंडे, विजय सार्वे, शिवशंकर रगडे, अविनाश चेटुले, वनिता सार्वे, रविंद्र राठोड आदी उपस्थित होते.