जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी घेतला मतमोजणीच्या पुर्वतयारीचा आढावा

0
35

गोंदिया, दि.18 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीकरीता जिल्ह्यातील नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या पुर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासनाचा आढावा जिहाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हाधिकारी कायालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतला.

         यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) तथा एक खिडकी नोडल अधिकारी मानसी पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी गोंदिया चंद्रभान खंडाईत, निवडणूक निर्णय अधिकारी तिरोडा पुजा गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी देवरी कविता गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार सहारे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे व जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये मंचावर उपस्थित होते.

          जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, निवडणूक प्रक्रियेतील मतमोजणी हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत नियुक्त अधिकारी व कर्मचारी, मतमोजणी पर्यवेक्षक (Counting Supervisor) मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक (Micro Observer) व मतमोजणी सहायक (Counting Assistant) यांनी मतमोजणीच्या प्रत्येक बाबतीत दक्ष राहून जबाबदारीने कामे करावी. कोणतीही चुक होणार नाही याकरीता मतमोजणी प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे व अचुक करावी असे त्यांनी सांगितले.

           यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली व त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतमोजणीकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.