स्वीप कार्यक्रम : कर्मचाऱ्यांचा सहभाग, मतदारांना होणार मदत
गोंदिया, दि.18 : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीत मतदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासन वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. याच उपक्रमांतर्गत एकाच दिवशी जिल्ह्यातील साडेनव लाख मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे वाटप 18 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.
ग्रामीण व शहरी भागात गावपातळीवर मतदानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी विशेष लक्ष देवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणूक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती होण्याच्या दृष्टीने एम. मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागात मतदान वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत, शाळा व आरोग्य विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावपातळीवरील मतदारांनी 20 नोव्हेंबर रोजी जास्तीत जास्त मतदान करण्याच्या दृष्टीकोनातून 18 व 19 या दोन दिवसात राबविण्यात येत आहे. सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी 9 लाख 50 हजार मतदारांना मतदान आवाहन चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी सांगितले.
असे केले आहे नियोजन : शासकीय शाळेतून 2 लाख, खाजगी शाळेतून 2 लाख, अंगणवाडी केंद्रातून 1 लाख 84 हजार, नगर परिषदेमार्फत शहरी भागात 32 हजार, राज्य परिवहन महामंडळ मार्फत प्रवासी यांना 20 हजार, रेल्वे विभागातून प्रवासी यांना 10 हजार, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 10 हजार, पंचायत विभागाकडून ग्रामस्तरावर 1 लाख 60 हजार, आरोग्य विभागातील बाह्यरुग्ण विभागातून 25 हजार, पशुवैद्यकीय विभागातून 20 हजार व इतर विभागातून 89 हजार, असे एकूण एकाच दिवशी 9 लाख 50 हजार मतदारांना मतदान आवाहन चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाचाही असणार सहभाग : जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक डिस्पेंसरी, नागरी आरोग्य केंद्र, आपला दवाखाना, नागरी आरोग्यवर्धीनी केंद्र, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र यांना 18 नोव्हेंबरला वरील सर्व आरोग्य संस्थेत बाह्यरुग्ण विभागात ओपीडीमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना व नातेवाईकांना 20 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीकरीता मतदान आवाहन चिठ्ठी वाटप करुन जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.