* राजकीय आखाड्यात जाण्यासाठी राजीनामा न देता परवानगी कशी?
गोंदिया – विधानसभा निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. अशातच तिरोडा -गोरेगांव विधानसभा मतदार संघातून जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत कंत्राटी कर्मचारी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत भाग्य आजमावत असल्याने पदावर राहताना निवडणूक लढवता येते काय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकाराने सदर कर्मचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरचढ ठरणार असून शासनाच्या योजना पोहचविताना विरोधातील मतदारांवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सदर उमेदवाराला पाठिंबा असल्याचे दिसून येते.
तिरोडा – गोरेगांव विधानसभा मतदार संघातून यावेळी जिल्ह्यातून सर्वाधिक 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह अनेक प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अतुल गजभिये निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गजभिये हे पत्रकारिता क्षेत्रातून जिल्हा परिषद गोंदिया येथे पाणी व स्वच्छता विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्य करताना मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे तिरोडा तालुक्याची जबाबदारी आहे. अनेकदा या तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, आशा व आंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याची कार्ये केलेली आहेत. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने यानंतर ते अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निश्चितच वरचढ ठरणार यात काही शंका नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना याआधी अनेक कंत्राटी कर्मचारी यांनी पदाचा राजीनामा देऊन निवडणुका लढलेल्या आहेत. मात्र गजभिये यांनी राजीनामा दिला नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कंत्राटी कर्मचारी यांना निवडणुकीसाठी दोन- दोन महिने कशी काय विभागप्रमुख सुटी देतात, हे पाहणे ही गरजेचे आहे. गजभिये यांच्याकडे जिल्हा परिषदेचे PRO म्हणून म्हणून ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र निवडणुकीच्या ओघात त्या पदाची कार्य ही वाहून गेल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे त्यांना पदावर राहून निवडणूक लढता येते काय? हे पाहणे गरजेचे आहे. निव्वळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून निवडणूक लढवून पुन्हा पदावर येणे हे तर प्रशासनाच्या दृष्टीने मात्र योग्य नाही. याबाबत विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वसामान्यांना वाटते. नाही तर यापुढे सर्वच विभागातून कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या रिंगणात असणार यात काही शंका नाही.
गजभिये यांच्याकडे स्वच्छ भारत मिशन च्या तिरोडा तालुक्याची जबाबदारी असल्याने निवडणुकीनंतर त्याच तालुक्यात विरोधातील लाभार्थांवर त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवन्याची
शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे याना विचारणा केली असता त्यांनी ते वैद्यकीय रजेवर असल्याचे सांगितले..तसेच चौकशी करण्यात येईल असे सांगितले.