बडोलेंना राष्ट्रवादीत आम्हीच पाठवले,कार्यकर्त्यांनो गैरसमज करून घेऊ नका-केंंद्रीय मंत्री गडकरी

0
698

गोंदिया,दि.१८ः मुंबईतील इंदूमिलची जागा भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ही जागा मिळवून घेत एक चांगले काम राजकुमार बडोले यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात झाले असून लंडन येथे बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले ते घर विकत घेण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासारखे चांगले काम त्यांनी केले आहे.भाजपचा कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी सर्वसामान्याची सेवा करीत जनतेत नाव कमावले.राजकुमार बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र व माझा होता,त्यामुळे आपल्या मनातील गैरसमज दूर करण्याचे आवाहन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार इंजि.राजकुमार बडोले यांच्या प्रचारसभेत सडक अर्जुनी येथे केंद्रिय मंंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पुढे गडकरी म्हणाले ८० टक्के खनिज संपती ही विदर्भातील जिल्ह्यात आहे.या भागात रस्ते व सिंचनाचे प्रकल्पांचे काम करतांना अनेक अडचणी येतात,त्या दूर करुन कामे केली जात आहेत.शेतीच्या व्यवसायासोबत मत्स्य व दुग्धव्यवसाय शेतकरी वर्गाला पोषक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.आपल्या भागात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे काम राज्यसरकार करणार आहे.जगाच्या कानाकोपर्यात येथील मासे,झिंगे पोचविण्याचे काम होणार आहे.या जिल्ह्यात दुध महत्वाचे व्यवसाय असून दुधाला चांगले भाव देण्याचा प्रयत्न मदर डेयरीच्या माध्यमातून केला आहे.सध्या ५ लाख लिटर घेत असून पुढच्या काही वर्षात ५० लाख लिटर दूध खरेदीची योजना आहे.दुग्धक्रांती नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असून दहा पटीने या व्यवसायात वाढ होणार आहे.

यावेळी माजी मंत्री नरोत्तम मिश्रा,राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल,भाजप जिल्हाध्यक्ष येशुलाल उपराडे,माजी आमदार राजेंद्र जैन,खोमेश रहागंडाले,हेमंत पटले,जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले,रचना गहाणे,लायकराम भेंडारकर,लक्ष्मण भगत,अशोक लंजे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना इंजि.राजकुमार बडोले म्हणाले की,विकासाचा जो झंझावत राज्यात महायुती सरकारने केला आहे,तो टिकवून ठेवण्याकरीता पुन्हा महायुतीचे सरकार येणे गरजेचे असून राज्यात सत्ता आल्यास २५ हजार रुपयाचे बोनस धानाला मिळणार असल्याची ग्वाही दिली.नितिन गडकरी साहेबांमुळेच आपण राजकारणात आल्याचे बडोले म्हणाले.मागच्या निवडणूकीत आपण पराभूत झाल्यानंतरही आपण सातत्याने मतदारसंघात विकासाची कामे महायुतीच्या माध्यमातून करीत राहिलो असून पुढेही मी काम करीत राहणार असून मूळ भाजपच्या असूनही महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून उभा असल्याची ग्वाही देत आहे.

यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले की,अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचा राहिलेला विकास पुर्ण करण्याकरीता व आपल्या भागाचा वेगळा चेहरा मोहरा जनतेसमोर आणण्याकरीता महायुतीचे उमेदवार म्हणून इंजि.बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दिली आहे.धान उत्पादकांकरीता २० हजार रुपयाप्रमाणे बोनस मिळालेला आहे.परंतु शेती ही परवडणारी असायला हवी.केंद्रातील सरकार सम्मान निधी देत असून राज्यातील सरकार १२ हजाराचे १५ रुपये करणार आहे.आपला शेतकरी विज बिल भरु शकत नसल्याने विजबिल माफीचा निर्णय घेतला असून आता तुम्हाला २४ तास विज देण्याचा निर्णय घेतला आहे.लाडक्या बहिणीसाठी कुणी विचार केला असेल तर महायुतीच्या सरकारने केला.परंतु काँग्रेसची सरकार आली तर लाडकी बहिण ही योजना बंंद होण्याची शक्यता होणार आहे.आम्ही तुम्हाला ही योजना काही मताकरीता दिलेली नाही हे सुध्दा लक्षात घ्यावे असेही पटेल म्हणाले.येत्या काही दिवसातच आम्ही झाशीनगरची योजना पुर्ण करणार असून धापेवाडा टप्पा ३चा पाणी सुध्दा आपल्या गावापर्यंंत आम्ही पोचवणार आहोत.