राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले, भाजपचे विनोद अग्रवाल,‍ विजय रहांगडाले व संजय पुराम विजयी

0
424

गोंदिया, दि.23 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) उमेदवार राजकुमार बडोले, तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणी आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम विजयी झाले.‍ त्यांना संबंधीत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधीकारी यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

          अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 19 उमेदवारांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत 2 लाख 58 हजार 966 मतदारांपैकी 1 लाख 81 हजार 286 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 82 हजार 506 व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बन्सोड यांना 66 हजार 91 मते पडली. राजकुमार बडोले यांनी दिलीप बन्सोड यांचा 16 हजार 415 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 801 मते पडली.

         तिरोडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 21 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 2 लाख 71 हजार 79 मतदारांपैकी 1 लाख 76 हजार 751 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले यांना 1 लाख 2 हजार 984 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार रविकांत बोपचे यांना 60 हजार 298 मते पडली.‍ विजय रहांगडाले यांनी रविकांत बोपचे यांचा 42 हजार 686 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 747 मते पडली.

          गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एकूण 15 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 3 लाख 25 हजार 556 मतदारांपैकी 2 लाख 31 हजार 385 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना 1 लाख 43 हजार 12 व  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांना 81 हजार 404 मते पडली.‍ विनोद अग्रवाल यांनी गोपालदास अग्रवाल यांचा 61 हजार 608 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1471 मते पडली.

     आमगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 2 लाख 69 हजार 499 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 184 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम यांना 1 लाख 10 हजार 123 व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार पुराम यांना 77 हजार 402 मते पडली.‍ संजय पुराम यांनी राजकुमार पुराम यांचा 32 हजार 721 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1194 मते पडली.

बंडखोराचा परिणाम नगण्य
गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघापैकी अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस(अप) व काँग्रेसच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवाराविरुध्द बंडखोरी केली होती.मात्र या बंडखोराचा परिणाम या दोन्ही मतदारसंघात फारसा पडल्याचे जाणवले नाही.ज्या पध्दतीने महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली,ती आघाडी कमी करण्याकरीता बंडखोरांनी मतदारांवर फारसा प्रभाव न पाडल्यानेच दो्न्ही मतदारसंघात बंडखोरांचा परिणाम नगण्य राहीला.

गोंदियात राहूल गांधीची सभा,मात्र काँग्रेसचा पराभव
गोंदिया विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचाराकरीता राहुल गांधी यांची सभा घेण्यात आली होती.मात्र राहुल गांधी यांच्या सभेचा प्रभाव मतदारावर जाणवला नाही.धनलक्ष्मी योजनेतून ३००० हजाराची घोषणा करुनही महिला मतदारांनीच नव्हे तर दलीत,आदिवासी मुस्लीम महिला मतदारांनीही त्यांच्या या घोषणेकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.

मनसे,वंचित बसपचा प्रभाव नगण्य

गोंदिया जिल्हयातील ४ ही मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.मात्र बसपला पाहिजे त्याप्रमाणात मतदारांनी यावेळी स्विकारलेले दिसून आले नाही.ओबीसी चेहèयासह उमेदवार रिगंणात उतरवूनही बसपला लाभ झालेला नाही.मनसेच्यावतीने गोंदिया विधानसभा मतदारसंघात ओबीसी चेहरा देण्यात आला,परंतु त्याचाही काही फारसा लाभ मनसेला झालेला नाही.
वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उतरविल्याने काँग्रेस बसपच्या मतांचे विभाजन थोड्याफार प्रमाणात झाले असले तरी ते प्रभाव पाडणारे नाही.गोंदिया जिल्ह्यातील कुठल्याही मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार रिगंणात नसल्याने त्याचा फटका येथे बसलेला नाही.पारंपरिक ज्या पक्षाना जो मतदान जायचा तो गेला मात्र गोंदियात यावेळी दलित,आदिवासी व मुस्लीम महिला मतदार लाडक्या बहिणीकडे व सरसकट बघितल्यास डीबीटी(डायरेक्ट खात्यात पैसे)येत असल्याने महायुतीकडे गेल्याचे दिसून आले.

तिरोड्याची जागा भाजपने कायम ठेवली आहे.अर्जुनी मोरगाव येथून जिल्ह्याचे माजी पालकमंंत्री राजकुमार बडोलेंनी विजय मिळवित राष्ट्रवादी काँग्रेसची जागा कायम ठेवली.आमगाव येथून राजकुमार पुराम व गोंदियातून विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला.विशेष म्हणजे सलग १५ वर्ष विधानसभेत जाणारे गोपालदास अग्रवाल पाचव्यांदा पक्ष बदलाने पराभूत झाले.

गोंदिया जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघाचे निकाल हाती आले असून यावेळी गोंदियाच्या इतिहासात नवी नोंद झालेली आहे.आजपर्यंतंच्या निवडणुकीत कधीही गोंदिया विधानसभा मतदारसंघातून कधीही भाजप उमेदवार निवडून कधीही आलेला नव्हता.हा इतिहास मात्र या मतदारसंघात यावेळी ६२ वर्षानंतर बदललेला आहे.व नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.आमदार विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून कमळ फुलविण्याचे भाजप नेत्यांचे स्वप्न पुर्ण झाले आहे.
तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बाजुने वातावरण असतांना त्याठिकाणी राष्ट्रवादीला विजय मिळविता आला नाही.उलट भाजपला पुन्हा विजय मिळविता आला.भाजपने ही जागा कायम ठेवत ३८ हजाराच्या मताधिक्याने निवडणूक जिंंकली.याठिकाणी भाजप उमेदवाराना पहिल्याफेरीपासून २१०० ने जी आघाडी घेतली त्यात प्रत्येक फेरीत वाढ होत चालली तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कुठेही आघाडी घेता आली नाही.

२०१४ मध्ये काँग्रेस १ व भाजप ३ जागा ,
२०१९ मध्ये भाजप १,काँग्रेस १,राष्ट्रवादी १ व अपक्ष १
२०२४ मध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार १