गोंदिया, दि.25 : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 24 नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरीता राज्यात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘‘संविधान दिवस’’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
त्याअनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा व ग्रामपंचायती तसेच सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात यावे. संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयामार्फत त्या दिवशी ‘‘संविधान यात्रा’’ काढण्यात यावी व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका, मूलभूत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरावेत. याबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध/भित्तीपत्रके/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने, कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि तेव्हापासून 26 नोव्हेंबर हा दिवस देशात ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जाऊ लागला.
भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावेत, स्वातंत्र्याच्या मुल्यांसह राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी ‘‘संविधान दिवस’’ साजरा करण्यात येतो.