मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले

0
239

दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू

भंडारा : सायंकाळच्या सुमारास शेताकडून आपल्या बैलगाडीने घराकडे जात असलेल्या एका शेतकऱ्याला बैलगाडीसह एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने चिरडले. या घटनेत शेतकऱ्यासह दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसाला बेदम मारहाण करून महामार्ग जाम केला. त्यानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (खुर्द) गावाजवळ मनसर- गोंदिया महामार्गावर रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या अपघातात दोन बैल आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हिरालाल हगरु कांबळे, ५२, रा. देव्हाडा खुर्द असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कर्मचारी गोविंद ठाकरे याला संतप्त गावकऱ्यांनी चांगलेच चोपले.देव्हाडा खुर्द येथून मनसर- गोंदिया महामार्ग जातो. या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मार्ग ओलांडणे कठीण जाते. घटनेच्या दिवशी मृतक हिरालाल कांबळे हे गुरे चारण्यासाठी रोशन पिंगळे यांच्या धाब्याजवळ आले होते.

सायंकाळच्या सुमारास घराकडे जाण्याकरिता रस्ता ओलांडत असताना तिरोड्याकडून एमएच ३५/एआर ९७१६ क्रमांकाच्या वाहनाने करडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व देव्हाडा बीडचे बीट अंमलदार गोविंद ठाकरे सुसाट वेगाने जात असताना त्यांनी हिरालाल कांबळे यांना व त्यांच्या दोन बैलांना जबर धडक दिली. या घटनेत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटना गावाजवळील असल्यामुळे ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. संतप्त लोकांनी ठाकरे यांच्या वाहनाची तोडफोड करून ठाकरे यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये पोलीस कर्मचारी ठाकरे जबर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.