भंडारा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल (दि.२३) नोव्हेंबर रोजी लागले. साकोली विधानसभेत लागलेल्या निकालानंतर या मतदारसंघातील वातावरणच तापलेले आहे. साकोलीचे नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांच्याबद्दल बोलताना अपशब्दांचा वापर करत थेट मोबाईल वरून शिवीगाळ करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे एक नगरसेवक यांच्यात झालेल्या या संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यासंदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
साकोली विधानसभेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. निकालानंतर येथील वातावरण तापलेले असताना एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली ज्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे लाखनी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक धनु व्यास यांनी भाजप भंडारा जिल्हाध्यक्ष यांच्याशी मोबाईलवर संवाद करतांना आमदार नाना पटोले यांच्याबद्दल मोबाईलवर अपशब्दात बोलत शिवीगाळ केली.
नगरसेवक धनु व्यास यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष यांना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास भ्रमनध्वनीवर संपर्क साधला होता. यावेळी जिल्हा अध्यक्ष यांनी विधानसभा निवडणुकीत नाना पटोले निवडून आल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे असे बोलणे सूरू असताना मोबाईल फोनवर आमदार नाना पटोले यांच्याबद्दल नगरसेवक धनु व्यास यांनी अपमानजनक अश्लील भाषेचा वापर करीत शिवीगाळ केली. या फोनवरील संभाषणाची ऑडियो क्लिप समाज माध्यमावर मोठ्यप्रमाणावर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यासह लाखनी तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या घटनेची दखल घेत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगराज झलके यांच्या मार्गदर्शनात शंभरहुन अधिक नाराज कार्यकर्त्यांनी (दि.२५) नोव्हेंबर रोजी लाखनी पोलिस ठाण्यात धनु व्यास यांचे विरोधात तक्रार दिली आहे. अश्लील संवादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, संपूर्ण राज्यात मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग वायरल झाली आहे. एकंदरीत,आमदार नाना पटोले यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव तर नाही ना? असा सवाल जनतेत उपस्थित केल्या जात आहे.
या घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला असून, लाखनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष यांच्याशी मोबाईलवर झालेला संवादाची रेकॉर्डिंग एका पेन ड्राइव्ह मध्ये कैद करून पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आली आहे. नाना पटोले यांना शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवक धनु व्यास यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँगेस पक्षाकडून तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.