अमरावती : रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे धामणगाव रेल्वे स्थानकानजीक मोठा अनर्थ टळला. रेल्वे रुळाला मोठा तडा गेल्याचे लक्षात येताच ट्रॅकमॅनने चार किलोमीटर धावत जाऊन गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस रोखल्याने अपघात टळला. भोलाराम मीना असे या ट्रॅकमॅनचे नाव असून त्याचे कौतुक केले जात आहे.
धामणगाव रेल्वे नजीक भोलाराम मीना हे गुरुवारी सकाळी रेल्वे रुळाची तपासणी करीत होते. यावेळी त्यांना एका ठिकाणी रेल्वे रुळाला सांध्याच्या ठिकाणी मोठा तडा गेल्याचे दिसले. या मार्गावरून काही वेळातच गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस जाणार होती. भोलाराम यांनी सुमारे चार किलोमीटर धावत जाऊन ही एक्सप्रेस वेळेत थांबवली. या कामगिरीबाबत भोलाराम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस सुरक्षितपणे या मार्गावरून नेण्यात आली. रेल्वे ट्रॅकमॅनच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नाही. रेल्वे रुळाची देखभाल ही अत्यंत महत्वाची मानली जाते. रेल्वे मार्गावर देखरेख ठेवण्याचे काम ट्रॅकमॅन हे कुठल्याही ऋतूत, प्रतिकूल हवामानात देखील करीत असतात. त्यांच्या दक्षतेमुळे अनेक अपघात टळले आहेत.