मुबंई,दि.२८ः– विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिलाये. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालय. पण आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास पाच दिवस उलटले आहेत, तरीही महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. पण येत्या दोन-तीन दिवसात महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होणार आहे.
आज राज्याचे कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री हा भाजपाचाच राहील असे संकेत मिळतं आहेत.
दरम्यान, आता भारतीय जनता पक्षाने राज्य पातळीवर नवीन तरुण नेतृत्व तयार करण्यासाठी ज्येष्ठ आमदारांना मंत्री करण्याऐवजी 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या आमदारांना मंत्री करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे राज्य मंत्रिमंडळात युवा आमदारांना संधी मिळेल असे बोलले जात आहे. हेच कारण आहे की पक्षाच्या अनेक दिग्गजांना आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे लागणार आहे.
दरम्यान आता आपण भाजपाच्या या धोरणामुळे कोणत्या ज्येष्ठ आमदारांना फटका बसू शकतो याबाबत माहिती पाहणार आहोत. भारतीय जनता पक्षाने ज्या आमदारांचे पन्नास वर्षांपेक्षा कमी वय आहे त्यांनाच मंत्रिमंडळात सामील करायचा असा एक अलिखित नियम बनवला असल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे राज्यातील भारतीय जनता पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील (वय 65), चंद्रकांत पाटील (वय 65), गिरीश महाजन (वय 64), चंद्रशेखर बावनकुळे (वय 55), मंगलप्रभात लोढा (वय 68), सुधीर मुनगंटीवार (वय 62), रवींद्र चव्हाण (वय 54), अतुल भातखळकर ( वय 59), मंदा म्हात्रे (वय 68), मनीषा कायंदे (वय 61) यांसारख्या अनेक जेष्ठ आमदारांना मंत्रिमंडळाच्या बाहेरच राहावे लागणार असे दिसते.
खरंतर भाजपा नेहमीच धक्कातंत्राचा अवलंब करत असते. भाजपाने खासदारकीसाठी सुद्धा अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. पक्षाच्या निर्णयामुळे काही जणांना इच्छा असून देखील लोकसभेची निवडणूक लढवता आलेली नाही.
जे लोक 75 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असा अलिखित नियम भाजपाने बनवलेला आहे. म्हणून लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या सारख्या पक्षाची उभारणी करणाऱ्या ज्येष्ठ सदस्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नियमांमुळे राजकीय निवृत्ती घ्यावी लागली.