=पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये १७ पुरुषांचा सहभाग
अर्जुनी मोर.-: कुटुंब नियोजन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अधिक प्रयत्नशील व बळकट करण्यासाठी यावर्षी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया पंधरवाडा दि.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेची तयारी करण्यात आली असून व्यापक प्रसिद्धी व्हावी जेणेकरून पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची गुणवत्ता पूर्ण व खात्रीशीर सेवा लाभार्थ्यांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने अर्जुनी मोरगांव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना/बाक्टी येथे दि.२२ व २८ नोव्हेंबर या दोन दिवसीय भव्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया व गरोदर माता शिबीर घेण्यात आला. उद्भवणाऱ्या बेरोजगारीला नियंत्रणात आणण्याकरिता कुटुंब नियोजन हाच एकमेव पर्याय असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.अभय पाटील यांनी सांगितले. पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा केल्याने पुरुष शस्त्रक्रियेबाबत समाजात जनजागृती होऊन पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गजभिये यांनी सांगितले. या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये एकुण १७ पुरुष सहभागी होऊन पुरुषानी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे.
त्याच बरोबर गरोदर माता शिबीर सुद्धा घेण्यात आला असून यावेळी उपस्थित सर्व गरोदर मातांना आरोग्य अधिकारी डॉ. डोंगरवार आणि डॉ. नाफडे यांनी आरोग्य तपासणी आणि आरोग्य सल्ला, सदर्भ सेवा दिली असून यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता कुलकर्णी, डॉ.कुंदन कुलसुंगे, डॉ.सुरेंद्र खोब्रागडे आणि PHC ची संपूर्ण चमू यांनी भव्य पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया व गरोदर माता शिबिराला सहकार्य केले.