राज्यातील सर्वात मोठया महासमाधान शिबिराला मुख्यमंत्री येणार-बडोले

0
8

एक हजार अपंगांना करणार सक्षम

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

राजकुमार बडोले : पत्रपरिषदेत दिली माहिती

गोंदिया,दि.16 :शासनाच्या प्रत्येक विभागाच्या लोकोपयोगी योजना जनतेच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभेतील तीन तालुक्याचे सयुक्तिंक महासमाधान शिबिर येत्या आॅगस्ट महिन्यात सडक अर्जुनी येथे आयोजित करण्यात आले आहे.राज्यातील सर्वात मोठे हे महासमाधान शिबिर राहणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.यावेळी 40 हजार लोकांना विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार असेही सांगितले.तसेच जिल्ह्यातील अपंगांसाठी राज्य शासनाने सर्वाधीक दोन कोटी मंजूर केले आहेत. येत्या ३0 जुलै रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक न्याय भवनात अपंगांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एक हजार अपंगांना सक्षम बनविण्यासाठी उद्योगांकरीता कर्ज वितरण केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सामाजीक न्याय व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१५) पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी अर्जुनी-मोरगाव येथे ऑगस्ट महिन्यात महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगीतले. शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत नसून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्या यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हाधिकारी तलाठी, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना कामावर लावले आहे. यात विधानसभा क्षेत्रातील ३६0 गावांतील ४0 हजार लोकांचे अर्ज भरविले जात आहे.
यांतर्गत २४ जुलै रोजी सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात, २७ जुलै रोजी अर्जुनी-मोरगावच्या प्रसन्ना सभागृहात व ३0 जुलै रोजी गोरेगाव यथे कॅम्प घेतले जाणार आहे. यासाठी तिन्ही तालुकास्थळांवरील तहसील कार्यालयात समाधान कक्षाची स्थापना करण्यात आली असून येत्या ८ ऑगस्ट पर्यंत अर्ज कक्षात द्यावयाचे आहेत. राज्यात २0 हजार प्रमाणपत्र तयार करून देण्याचे कार्य पूर्वी काही जिल्ह्यांत झाले आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात ४0 हजार प्रमाणपत्र तयार करून देणे हा एक नवीन रेकॉर्ड असणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते.