वाशीम,दि.०२ : जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय वाशीम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास संबोधित करताना डॉ.अनिल कावरखे यांनी सांगितले की, ” एच.आय.व्हीच्या संक्रमणामुळे होणाऱ्या एड्स आजाराविषयी वारंवार करत असलेल्या जनजागृतीमुळे एच.आय.व्हीचा प्रसार रोखण्यात तसेच एड्समुळे होणाऱ्या मृत्यूत घट झाल्याचे आढळून आले आहे.” कार्यक्रमाच्या सुरुवातीस पथनाट्यद्वारे एड्स आजाराची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर एड्स रुग्णास सामान्य वागणूक व हक्क देण्याबाबतची शपथ घेऊन आयोजित पायी रॅलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतिन मेश्राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे यांनी हिरवा झेंडा दाखवून घेऊन रॅलीस सुरुवात झाली.यामध्ये मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, NCC, NSS, स्काऊटगाईडचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी केली जात असल्याने गेल्या १० वर्षाच्या तुलनेत एड्स संसर्गाचे प्रमाण ०. ४ टक्के खाली आल्याचे सकारात्मक चित्र आहे. लवकरच हे प्रमाण शून्य टक्के आणण्याचा मानस असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले. एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात, त्या अंतर्गत जिल्हा स्तरावर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय मार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एचआयव्ही प्रतिबंध व नियंत्रणासाठी वेगवेळ्या सेवा कार्य करत आहेत. सध्या जिल्ह्यात एचआयव्ही समुपदेशन व चाचणी करण्यासाठी एकूण ०६ आयसीटीसी कार्यरत आहेत त्याच प्रमाणे २७ पीपीपी व एफआयसीटीसी, २८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ०१ जेल व ०३ ग्रामीण रुग्णालयामधील, ज्या ठिकाणी प्रशिक्षित समुपदेशक व प्रयोग शाळा तंत्रज्ञ कार्यरत आहेत; त्या केंद्रामार्फत एचआयव्ही समुपदेशन, विशेष व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रबोधन केले जाते. त्याचप्रमाणे जे संसर्गित रुग्ण आहेत त्यांना औषधोपचार व तसेच मानसिक आधार योजनेचा लाभ दिला जात आहे.
नवीन पिढी मध्ये एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये म्हणून EMTCT (ELIMINATION MOTHER TO CHILD TRANSMISSION) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वर्ष २०१४ मातांमधील एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण १.०० होते. सर्व स्तरावर गरोदर एचआयव्ही तपासणी, समुपदेशन व निदान होत असल्यामुळे हे प्रमाण २०२१ मध्ये ०.५८ तर वर्ष २०२४ मध्ये ०.०५ इतके कमी झाले आहे. दरम्यान, त्वचा व गुप्तरोग केंद्र, एआरटी केंद्र रक्त संक्रमण विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असल्याची माहिती डॉ. कावरखे यांनी दिली. “भेदभावरहित वागणूक हेच राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे फलित होय” जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे.
*काय सांगते जिल्ह्याची आकडेवारी*
जिल्ह्यामध्ये २०१४ मध्ये सामान्य रुग्णामध्ये एचआयव्ही संसर्गित ०.६० टक्के होते. त्यानंतर २०२४ मध्ये हे प्रमाण ०.३३ टक्कयांवर आले. सेवा केंद्रामध्ये वाढ तसेच तपासणीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे व जनजागृती मोठ्या प्रमाणात होत गेल्यामुळे २०२४ मध्ये हे प्रमाणा ०.२७ टक्क्यापर्यंत घटले आहे.
सद्यस्थितीत एआरटी केंद्रामध्ये नोंद असलेल्या एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या ३७८२, पैकी या जिल्ह्यात औषधोपचार सुरु असणारे रुग्ण २०२२ इतके असून दुसऱ्या जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६३२ इतकी आहे. यामध्ये एचआयव्ही बाधित गरोदर माता १८२ तर २६६ बालकांचा समावेश आहे. तर एड्समुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ११२८ इतकी आहे.
२०२१ सालापासून आजपर्यंत १ लाख ४२ हजार ९०५ जणांची आयसीटीसी केंद्रात तपासणी झाली असून एचआयव्हीसह जगणाऱ्या सामान्य रुग्णांची संख्या ३९० आहे. त्याचप्रमाणे ८८ हजार ४४१ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एचआयव्हीसह जगणाऱ्या गरोदर मातांची संख्या २५ इतकी आहे.