गोंदिया,दि.१२ः तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोरवाही येथे शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती पुजा अखिलेश सेठ यांच्या हस्ते,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी प्रास्तविकात भारत सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणानुसार सन २०२५ पर्यंत टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत टिबी वर मात करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन समाजातुन टीबी हद्दपार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.त्या दृष्टीने जिल्हयामध्ये शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत रुग्णशोध मोहिम दि.७ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नविन क्षयरुग्णांचे शोध मोहिम राबवुन मोफत औषधोपचार देण्यात येणार आहे.क्षयरोगाचा प्रसार थुंकीद्वारे एका रुग्णापासुन दुस-याला होत असतो.क्षयरोग हा मायक्रोबॅक्टोअिम ट्युबरक्युलोसिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी दि. ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ पर्यत १०० दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.या मोहिमेत निक्षय शिबिराद्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असुन त्यामध्ये २ आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, मंदावणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, संध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे, पुर्वी क्षयरोग झालेले क्षयरोग बाधित रुग्णाच्या सहवासीत, एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषीत व्यक्ती, ६० वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित, धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करावयाची आहे. तपासणी अंती निदान झालेल्या क्षयरुग्णास औषधोपचार मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले.
समाजकल्याण सभापती पुजा अखिलेश सेठ यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत सर्व क्षयरुग्णांना सामाजिक संस्था, सन्माननीय व्यक्ती यांनी दानशुर बनुन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे व त्यांना पोषण आहार किट देण्याबाबत आवाहन केले.जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी शंभर दिवसीय टीबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत गावातील अतिजोखमीच्या लोकाना शोधुन त्यांची मोफत एक्स-रे करण्यात येणार आहे. सोबतच त्यांची थुंकी नमुना व आवश्यक प्रयोगशाळा तपासणी सुद्धा करण्यात येणार असल्याचे सांगितले.तरी आरोग्य कर्मचारी व विशेषतः ग्रामपातळीवरील आशां यांनी क्षयरोगाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक आरोग्य केद्र मोरवाहीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल खोब्रागडे,गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलेश जाधव यांचे सोबत आरोग्य केंद्रातील आशा सेविका,गट प्रवर्तक,स्टाफ नर्स,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,परिचर मोठ्या संख्येने उपस्थित होते.