गोंदिया,दि.१४ः-जिल्हयातील आमगाव,सालेकसा, देवरी व सडक अर्जुनी या चारही तालुक्यातील अंगणवाडयांमध्ये व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाहय बालकांसह एकुण 1,19,197 बालकांना जंतनाशक गोळी दि. 4 डिसेंबर 2024 रोजी देण्याचे उद्दिष्ट होते. तर ज्या मुलांना दिनांक 4 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी खाल्ली नसेल त्यांना दि.10 डिसेंबर रोजी मॉप अप दिवशी गोळी खावु घालण्यात आली.सर्व सरकारी व खाजगी शाळेत शिक्षंका मार्फत व अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका मार्फत सर्व बालकांना जंतनाशक गोळी प्रत्यक्ष खाऊ घालण्यात आली.
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या जंतनाशक मोहिमेदरम्यान 96.96 टक्के बालकांना जंतनाशक गोळ्या प्रत्यक्ष खावु घालण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त राबविण्यात आलेली ही मोहीम जिल्ह्यातील चारही तालुक्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
1 ते 19 वयोगटातील मुलांना शाळा, अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन बालकांचे आरोग्य, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावावा तसेच बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी प्रजित नायर व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दि.४ डिसेंबर जंतनाशक दिनी व दि.१० डिसेंबर मॉप अप दिनी चारही तालुक्यांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली होती.या माध्यमातून जिल्ह्यातील 1 ते 19 वयोगटातील बालकांचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थीस जंतनाशकाची गोळी देऊन मोहीम प्रभावीपणे राबवली गेली.
लहान मुलांमध्ये जंताचा संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. जंताचा संसर्ग झाल्यास लहान मुलांचा शारीरिक विकास होत नाही.जंतनाशकामुळे मुलांची आकलनशक्ती सुधारणे, अन्य संसर्गाचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढणे, दीर्घकाळ काम करणे आणि अर्थार्जनाची क्षमता वाढण्यासह अन्य बाबींसाठी मदत होते. जंतनाशक मोहिमे दरम्यान सर्व सरकारी, खासगी शाळा, अंगणवाडी येथील बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात 1 ते 19 वयोगटातील 119197 बालकांपैकी 115576 मुलांना जंतनाशक विरोधी अल्बेंडेझॉल गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.त्याचे प्रमाण 96.96 टक्के आहे.तालुका निहाय विचार केला असता आमगाव तालुक्यात 31942 पैकी 31869 मुलांना जंतनाशक विरोधी अल्बेंडेझॉल गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.त्याचे प्रमाण 99.77 टक्के एवढे आहे. देवरी तालुक्यात 34636 पैकी 31293 मुलांना जंतनाशक विरोधी अल्बेंडेझॉल गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.त्याचे प्रमाण 90.35 टक्के एवढे आहे. सडक अर्जुनी तालुक्यात 29375 पैकी 29317 मुलांना जंतनाशक विरोधी अल्बेंडेझॉल गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.त्याचे प्रमाण 99.80 टक्के एवढे आहे.तर सालेकसा तालुक्यात 23244 पैकी 23097 मुलांना जंतनाशक विरोधी अल्बेंडेझॉल गोळी प्रत्यक्ष खावु घालण्यात आली.त्याचे प्रमाण 99.37 टक्के एवढे आहे.
जंतनाशक मोहिमेदरम्यान अंगणवाडयांमध्ये व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाहय बालकांसह कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील चारही तालुक्यातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी स्वतः शाळांमध्ये उपस्थित राहून मुलांना जंतनाशक गोळ्या प्रत्यक्ष खाण्यासाठी मार्गदर्शन केले.जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षण मोलाचे ठरले.