सटवा येथे अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
गोरेगावः – विद्यार्थी जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्या सुप्त गुणांचा विकास होतो, त्यामुळे या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. सभापती मोरेश्वर कटरे यांनी केले.
शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील सटवा येथे गणखेरा केंद्राचे तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक १० डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सटवाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता १२ डिसेंबर रोजी सायंकाळी बक्षीस वितरण करून करण्यात आली. यावेळी ते बक्षीस वितरण म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू तर प्रमुख अतिथी म्हणून तुमखेडाचे सरपंच रंजू येडे, सटवा सरपंच अर्चना ठाकूर, उपसरपंच विनोद पारधी, भागचंद्र रहांगडाले, पुरगाव उपसरपंच नरेंद्र रहांगडाले, सटवा पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, एस.यू.वंजारी, केंद्रपमुख एन. एस. हरदुले, मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे लोकेश बघेले, गणखैरा शालेय व्यवस्थापन समितीचे संतोष पारधी, तुमखेडा शालेय व्यवस्थापन समितीचे मुकेश बेलगे, रामेश्वर रहांगडाले आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्पराज जनबंध, उपसरपंच विनोद पारधी, एस.यू. वंजारी यांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी क्रीडा स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत क्रमांक पटकावणा-यांना बक्षीस देवून गौरव करण्यात आला. तसेच सांस्कृतिक प्रकारात क्रमांक पटकावणाऱ्या शाळांचा व वैयक्तिक पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलेगावच्या वतीने आकर्षक प्रेक्षणीय लेझीम कवायत सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहायक शिक्षक आर.सी.बिसेन यांनी तर आभार सहायक शिक्षक डी. के. रहांगडाले यांनी केले.