विशेष शिबिरांच्या आयोजनातून उपलब्ध होणार शासकीय सेवा
नागपूर,दि. 18 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 19 डिसेंबर रोजी या सप्ताहाचा शुभारंभ होत असून नागरिकांनी या सप्ताहात अधिक संख्येने सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताहाच्या पुर्वतयारीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हास्तरीय विभाग प्रमुख व तालुकास्तरीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
केंद्र शासनाने ‘गाव की और’ या शिर्षकाखाली ग्रामीण भागाशी कटिबध्दता अधिक दृढ केली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकाभिमुख करण्यासह नागरिकांच्या काही अडीअडचणी या सप्ताहादरम्यान दूर करणे, निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच बरोबर पी.जी. पोर्टल, आपले सरकार सेवा केंद्रातील सेवावरील सर्व तक्रारी निकाली काढणे, शिबिरातून नागरिकांना विविध विभागांचे विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जात प्रमाणपत्राचे वाटप, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रकरणे, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, जिल्हापरिषद, महानगरपालिका व नगर परिषद मार्फत कर वसुली, ग्रामपंचायत स्तरावरील विविध सेवा व दाखले या शिबिरात दिले जातील. सोबतच इतर योजनांच्या लाभार्थ्यांची निवड, भूमिअभिलेख विभागामार्फत लोकांना जमिनीची सनद देण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत ‘दवाखाना आपल्या दारी’ योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व विभागांना विभागानिहाय उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी प्रत्येक विभागाप्रमुखांनी कटिबध्द होऊन यात योगदान देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.