शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
485
  • ‘सुशासन सप्ताह’बाबत कार्यशाळेचे आयोजन
  • ‘प्रशासन गाँव की ओर’सुशासन सप्ताहाची थीम

       गोंदिया, दि.23 : केंद्र व राज्य शासनामार्फत सामान्य नागरिकांच्या कल्याणाकरीता विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची यंत्रणांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

        सुशासन सप्ताह निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर व सामाजिक कार्यकर्त्या रजनी रामटेके मंचावर उपस्थित होते.

           प्रशासन गांव की ओर’ ही सुशासन सप्ताहाची थीम (संकल्पना) आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात सामान्य नागरिकांना माहिती व्हावी तसेच यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण विभागामार्फत सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहनिमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत यासंदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सर्व कार्यालयाने सुशासन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

         नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणेत्यांना सुलभ सेवा पुरविणेजिल्हाउपविभागतहसिल स्तरावरील योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करणे. याबाबत शिबीर आयोजित करण्याचे केंद्रीय विभागाने सुचविले असून जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

        सदर शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरणआपले सरकारसह विविध पोर्टलवर प्राप्त तक्रारीचे निराकरणऑनलाईन देण्यात येणाऱ्या सेवांचा वेळेत निपटारा करणेसेवा देण्याकरीता ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करणे आदी निर्देश देण्यात आले आहेत. सर्व नागरिकांना पायाभुत सुविधा मिळाल्या पाहिजेत, लोकांना रोटी-कपडा ओैर मकान याबाबत सुविधा देण्यात आल्या पाहिजे. आपल्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनांचा लोकांना लाभ मिळवून देण्यात यावे. तसेच आपल्या कामात सुधारणा करावी, कामात दिरंगाई करु नये, आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिक व पारदर्शकपणे पार पाडून शासनाच्या योजनांचा लोकांना लाभ मिळवून द्यावा, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी सुशासन सप्ताह निमित्ताने तंबाखु व गुटखा खाणाऱ्या व्यक्तींसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत असून त्याची जनजागृती करण्यात येत आहे असे सांगून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे वेळेवर करण्यात यावे, कामात दिरंगाई करु नये, लोकांची कामे वेळेवर झाली पाहिजेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

        यावेळी सुशासन सप्ताह निमित्त राबविण्यात येत असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास, मोदी आवास, रमाई आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अहिल्याबाई होळकर अवास आदी योजनांबाबत, विस्तार अधिकारी (शिक्षण) पोर्णिमा विश्वकर्मा यांनी जिल्हा परिषद शाळेचे आधुनिकीकरण अंतर्गत डिजिटल करण्यात आलेल्या शाळा व विविध स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय व विभागस्तरावर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या शाळा, विभागीय वन अधिकारी तुषार ढमढेरे यांनी वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे यांनी पोलीस विभागामार्फत दादालोरा खिडकी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक फारुख शेख यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.