साप चावा घेतला नंतर मांत्रिक कडे न जाता डॉक्टरांकडे जा-एम.मुरुगानंथम

0
231

गोंदिया,दि.२८ः-सर्पदंशाच्या वाढत्या प्रकरणांमुळे सार्वजनिक आरोग्याची चिंता वेगाने वाढत आहे. यासंदर्भात आता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलताना देशातील सर्पदंशाची प्रकरणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू अधिसूचित विकार (‘नोटिफायेबल डिसीज) म्हणून घोषित केला आहे. सर्व खाजगी रुग्णालये व सरकारी आरोग्य केंद्रांना अशा प्रकरणांची आणि मृत्यूची नोंद करणे अनिवार्य केले आहे.’साप चावणे ही सार्वजनिक आरोग्याची चिंता आहे आणि काही प्रकरणांमध्ये यामुळे मृत्यु, आजारपण आणि दिव्यांगत्व येते.शेतकरी, आदिवासी लोकसंख्या इत्यादींना जास्त धोका आहे.
सर्पदंश आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती गठित झाली असुन समितीची सभा दि.23 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.
पावसाळा येताच साप चावण्याचे प्रकार देखील वाढतात.पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो.तर, मुसळधार पावसामुळं सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी जागेचा आडोसा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील अडगळीच्या खोलीत किंवा घराजवळच्या एखाद्या ठिकाणी आसरा शोधतात. अशावेळी अनावधनाने आपण तिथे जातो आणि साप डसतो.
सर्पदंश झाल्यानंतर अनेक जण घाबरुन जातात.गावाकडे अजूनही साप चावल्यानंतर एखाद्या बुवा-बाबाकडे किंवा मांत्रिकाकडे विष उतरवण्यासाठी नेण्यात येते. मात्र, या प्रकारामुळं एखाद्या व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो.साप चावा घेतला नंतर मांत्रिका कडे न जाता वैज्ञानिक  डॉक्टरांकडे जाण्यावर लक्ष देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.

सर्पदंशांच्या समस्येचा सामना करण्यासाठी सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती गठीत केली असुन २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या निम्मी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य संस्थाना (वैद्यकीय महाविद्यालयांसह) सर्व संशयित सर्पदंश प्रकरणे आणि मृत्यूची नोंद संलग्न नमुन्यात करण्यात येणार आहे. सर्पदंशाच्या घटना आणि मृत्यूंवर अचूक नजर ठेवुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे.
सर्पदंश आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,नोडल अधिकारी डॉ.पोषण बिसेन,जिल्हा पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.कांतीलाल पटले,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,साथरोग तज्ञ डॉ.तनया चौधरी यांचेसह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक,आरोग्य विभाग,वन विभाग,कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्पदंश म्हणजे काय –
सर्पदंश ही सापांची इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीची संरक्षक यंत्रणा आहे विषारी साप चावण्याला सर्पदंश म्हणतात. याचा मज्जा संस्था, हृदय किंवा रक्त उत्पादक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. जे वेळेत उपचार न केल्यास प्राण घातक ठरू शकते.

सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा कराल
सर्पदंश झाल्यावर तत्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत ब-याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत.त्यामुळे डॉक्टरांपर्यंत पोहोचेपर्यंत हा उपचार अत्यंत महत्त्वाचा आहे, तो कसा कराल?

  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सर्वप्रथम जमिनीवर झोपवावे. कारण जर तो व्यक्ती चालत-फिरत असेल तर विष शरीरात लवकर पसरते.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला घाबरवू नका त्याला हिंमत द्या. कारण घाबरल्यानंतर रक्तप्रवाह वाढतो अशाने शरिरात विष लवकर पसरते.
  • पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे.
  • विषारी साप हाताला चावला असेल तर दंडाला दोरीने हलकेसे बांधावे जोरात आवळून नाही.
  • ज्या व्यक्तीला सापाने दंश केला आहे त्याला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.
  • शरीराचा जो भाग सापाने चावला आहे तो भाग हृदयाच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अजिबात हालचाल करण्याचा प्रयत्न करू नका.
  • विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने हलकेसे बांधावे जोरात आवळून नाही.
  • आवळपट्टी बांधताना दंड व दोरीच्या मध्ये पेन, काडी किंवा बोट चाकून बांधावे बांधल्यानंतर ते बाहेर काढावे.
  • दर 15 ते 20 मिनिटांनंतर बंद 15 सेकंदांसाठी सोडावा व पुन्हा त्याच पद्धतीने बांधावा.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये.
  • दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये त्यामुळे जास्तीचा रक्तस्राव होऊन व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.
  • साप चावलेल्या व्यक्तीच्या हातावर किंवा पायावर बांधलेली कोणतीही वस्तू, जसे की घड्याळ, बांगडी, पायल, ब्रेसलेट किंवा पायल काढा. साधारणपणे साप चावल्यावर सूज येते, त्यानंतर या गोष्टी काढणे कठीण होते.
  • दवाखान्यात जातांना शक्यतो फोनवर डॉक्टरांना कळवावे जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल. 108/102 वर आपत्कालीन अँबुलन्स वाहन वर मदत घ्या.
  • दंश झालेल्या व्यक्तीला दमा किंवा अ‍ॅलर्जी अथवा एकादा आजार असल्यास डॉक्टरांना कळवावे.

सर्पदंश झाल्यास हे करू नका
सापाचे विष मंत्राने उतरत नाही दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तत्काळ दावाखान्यात न्यावे, कारण सर्पदंशावर प्रतिसर्प विष हे एकमेव औषध आहे. म्हणून मांत्रिकाकडे नेऊ नका.

  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीला कडूलिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका यामुळे तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवता तसे करू नका.
  • सर्पदंश झालेल्या जागेवर कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका किंवा कोणत्याही बिया वगैरे खाण्यास देऊ नका.
  • चाव्याजवळ कापड किंवा टर्निकेट घट्ट बांधू नका यामुळे रक्त परिसंचलन बंद होऊन गुंतागुंत वाढु शकते.
  • रुग्णाला बेशुद्ध होऊन देऊ नका.
  • साप चावलेल्या व्यक्तीला झोपण्यापासून थांबवा.
  • सर्पदंश झालेली जागा/ घावावर बर्फ लावू नका.
  • जखमेतून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका
  • सर्पदंश झाल्यास धोत-याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका. तसे केल्याने विषबाधा होत नाही, असा गैरसमज आहे. तसे करू नका.
  • सर्पदंश झालेल्या जागेवर गरम केलेले लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे तसे करू नका.
  • सर्पदंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका.
  • सर्पदंश होताना तो उलटला तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे वेळ न दवडता तत्काळ दवाखान्यात जा.
  • सर्पदंश झालेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार लावू नका. असे केल्याने विष उतरत नसते, तो गैरसमज आहे.
  • सर्पदंश झाल्यास त्या सापास पकडून चावल्याने विष उतरते, असा गैरसमज आहे. तसे करू नका. अशा वेळी साप चवताळलेल्या अवस्थेत असल्याने तो आणखी चावा घेऊ शकतो.
  • सर्पदंश झालेल्या व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे.
  • दंश झालेल्या व्यक्तीने कोणतेही वाहन चालवू नये.सर्पदंश झाल्यास इतर सर्व उपाय हे निरर्थक व वेळ वाया घालवणारे आहे. त्यामुळे विषबाधित व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्पदंशावर एकमेव उपाय म्हणजे प्रतिसर्पविष (स्नेक अँटिव्हेनिन) हेच होय, जे शासकीय सामान्य रुग्णालयात मोफत दिले जाते. ज्या केंद्रात विष प्रतिरोधक त्वरित मिळू शकेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवा.

सर्पदंशापासून वाचविण्यासाठी खालील उपाययोजना करु शकतात
योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदोष रोखला जाऊ शकतो हे मृत्यू आणि विकृती कमीच करू शकते आणि रोखू शकते

  • रात्री मशाल टॉर्च किंवा दिवा घेऊन बाहेर पडा.
  • दाट गवतातून जाण्यापूर्वी जाड बुट आणि लांब पॅन्ट घाला. घराबाहेर पडताना लाँग-बूटचा वापर करावा.
  • कोणताही दगड किंवा खडक हलविताना किंवा स्वयंपाक करण्यासाठी लाकूड गोळा करताना आणि डोंगराळ भागात फिरताना किंवा लहान तलावात आणि नद्यात पोहताना सावध राहा. दगडाच्या खाली, खड्ड्यात साप असण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं अशा जागांवर कोणतीही छेडछाड करु नका.
  • स्टोअर किंवा बेसमेंट मध्ये साप किंवा उंदीरासाठी योग्य रीपिलेंट वापरा
  • हालचाल न करणारा किंवा अर्ध मेला वाटणारा साप पकडण्याचा प्रयत्न करू नका
  • झोपेच्या आधी नेहमीच तुमचे अंथरूण तपासा आणि जमिनीवर झोपणे टाळा
  • ज्यांची घरं शेतात असतील आणि ते जमिनीवर झोपत असतील तर त्यांनी झोपण्यापूर्वी मच्छरदाणीचा वापर करावा.

 पुढील कारणांपैकी एका कारणामुळे हे विष रक्त प्रवाहात प्रवेश करू शकत नाही.
 सापाच्या दंशात विष नसते. याला ड्राय बाईट म्हणूनही ओळखले जाते.
 संरक्षक कपडे किंवा बूट घातल्यामुळे सापाला चावा घेता येत नाही.
 काही कमी गंभीर प्रकारांच्या बाबतीत सापाच्या विषाची गळती होऊन जाते.
 कधी कधी दंश वरचेवर असतो आणि विष शरीरात प्रवेश करू शकत नाही .