शिवशाही बस अपघात महिनाभरानंतरही आठवणी ताज्याच
जखमी अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत
प्रधानमंत्री मदत निधीची प्रशासनासह नातेवाईंकाना वाट
गोंदिया,दि.२९ ः २९ नोव्हेंबरचा तो दिवस… त्या शिवशाही बसमधील प्रवाशांसाठी काळ बनला… समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव शिवशाही उलटली… अन् ११ प्रवाशांचा जीव गेला… २९ प्रवासी जखमी झाले… या घटनेने जिल्हा हादरून गेला… आज २९ डिसेंबर या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे… अजूनही या अपघाताच्या आठवणी अंगावर शहारे आणत आहेत… या अपघातात मृत पावलेल्या ११ प्रवाशांपैकी ६ प्रवाशांच्या नातेवाईकांना महिना लोटूनही अद्याप मदत मिळालेली नाही.त्यातच जखमींना राज्य परिवहन महामंडळाकडून व प्रधानमंत्री मदत निधीचीही रक्कम अद्याप पोचती झालेली नाही.
एमएच ०९/ ईएम १२७३ क्रमांकाची भंडारा आगाराची शिवशाही बस घेऊन चालक प्रणय रायपूरकर व वाहक नितीन मते हे भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेने निघाले होते. बसमधून एकूण ४० प्रवासी प्रवास करीत होते. सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरीलगच्या वृंदावनटोला फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका दुचाकीचालकाला वाचविण्याचा प्रयत्न बसचालक
प्रणय रायपूरकर याने केला. याकरिता त्याने करकचून ब्रेक दाबला. त्यामुळे भरधाव असलेली बस अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेले बॅरिकेट्स तोडत बस वाहकाच्या बाजूला उलटली. बसचा वेग इतका जास्त होता की बॅरिकेट्सचे काही खांब उखडून पडले. काही खांब वाकत गेले. बॅरिकेट्स प्रवाशांच्या सीटजवळून घासत गेले. अन् क्षणात शिवशाही बस उलटली. काही प्रवासी जिवाच्या आकांताने बसच्या मागील व पुढील काच तोडून बाहेर निघाले. या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २९ प्रवासी जखमी झाले होते. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आणि शासकीय यंत्रणेने मतदकार्य सुरू करीत जखमींना रुग्णालयात हलविले. मृतदेह गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात शवविच्छेदनगृहात होते. ईथे काही नातलगांनी हंबरडा फोडला. काहींचे अश्रू गोठले होते. या अपघातात कोणी पत्नी-पत्नी, कोणाच्या डोक्यावरचे छत उडाले. कुणाचे वडील, तर कोणाची आई मृत्यूमुखी पडली. ही घटना ज्या मार्गावर घडली, त्या मार्गावरून मार्गक्रमण करताना आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात. आठवणी ताज्या होतात.
पाच मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत
या अपघातात एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापैकी पाच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत देण्यात आली. आणखी सहा कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी मदतनिधी रखडला असून, कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर संबंधित मृतांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदत दिली जाईल, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
प्रधानमंत्री मदत निधी प्रकियेतच
बस अपघातातील मृताच्या कुटुबियांना प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून २ लाख रुपये व जखमींना ५० हजाराची मदत जाहीर केली होती.ती मदत रक्कम अद्यापही अपघातातील मृत व जखमींच्या नातेवाईकांना मिळालेली नाही.यासंदर्भात जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी राजन चौबे यांना विचारणा केली असता ११ मृत प्रवाशी व १२ जखमी प्रवाशांचे नाव प्रधानमंत्री मदत निधीकरीता पाठविण्यात आले असून त्या नावाना मंजूरी मिळालेली आहे.त्यांची कागदपत्राची पडताळणीही झालेली असून येत्या काही दिवसात संबधितांच्या बँक खात्यावरच ही रक्कम प्रधानमंत्री मदत निधी कार्यालयाकडून पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.