गोंदियात संत जगनाडे महाराजांची जन्मशताब्दी उत्साहात
रॅली आणि कीर्तनामुळे वातावरण संतमय
गोंदिया ता. 29 डिसेंबर :-छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले नसते तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर कळाले नसते. तेव्हा महापुरुषांचे विचार रुजविण्यासाठी पायाभूत प्रयत्नांची समाजाला गरज आहे असे प्रतिपादन विदर्भ तेली महासंघाच्या उपाध्यक्ष वंदनाताई वनकर यांनी (ता. 28) केले. येथील मालवीय नगर परिषद शाळेच्या भव्य प्रांगणात आयोजित संत जगनाडे महाराजांच्या 400 व्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष सुनील भरणे हे होते. मंचावर तेली समाज भाईचारा कमेटीचे कार्यकर्ते बळीराम डोरले, चंपालाल साठवणे, आदिवासी समाजाचे नेते पवन टेकाम, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई बेदरकर आणि माजी नगराध्यक्ष आशाताई पाटील उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना श्रीमती वनकर म्हणाल्या की, येथील प्रस्थापित
समाजव्यवस्थेने आमच्या महापुरुषांचे दैविकरण केलं.कार्यक्रमात गर्दी कमी असली तरी प्रत्येक कार्यकर्ता हा दर्दी असतो.आपली मुलं हे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना वैचारिक प्रबोधन ऐकविण्यासाठी अश्या कार्यक्रमात शामिल करून संस्कारीत करा.
त्या पुढे म्हणाल्या की, कुणावर टिकाटिपणी करण्यापेक्षा कार्यकुशल कार्यक्रम आयोजित करणे आवस्यक आहे.
प्रसंगी तिळगुळ कार्यक्रम तसेच साहित्यिक, सामाजिक आणि उद्योजक कार्यक्रम आयोजित करून हे साध्य करता येईल असे त्या म्हणाल्या.एका बाजूला शासन राईट टु एज्यूकेशन हे धोरण राबवतं तर दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा बंद करण्यात येत आहेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.त्यांनी पुण्यश्लोक महाराणी अहील्यादेवी होळकर यांच्या कार्याची महती गायीली.पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जमिनीचा 7/12 नमुना अहिल्यादेवीने पुरस्कृत केला असे सांगितलं.
याप्रसंगी श्री भरणे यांनी आपले विचार व्यक्त करतांना, भारतीय संविधानाची कलम 340 यामुळेच मंडल आयोग निर्माण झाला. बहुजनांचे हृदय सम्राट कांशीराम साहेबांचे मंडल आयोग लागू करो आंदोलन हे OBC च्या हिताचे होते, असे सांगितले.
याप्रसंगी श्री टेकाम यांनी,संत तुकाराम महाराज,संत जगनाडे महाराज यांनी क्रांतीचा मार्ग दाखविला. परिणामी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशातील विषमतावादी तत्व नष्ट होऊन सामाजिक बांधिलकी निर्माण झाली आहे., असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सविता बेदरकर यांनीही मार्गदर्शन केलं, त्या म्हणाल्या की, संत तुकाराम महाराजांच्या गाथांचे पुनर्लेखन संत जगनाडे महाराजांनी केलं आणि त्यामुळे संताजींचा होता माथा म्हणून वाचल्या तुकारामांच्या गाथा ही म्हण समाजात रुजली आहे. या गाथांमुळे अंध श्रद्धा, बुआबाजीचे उच्चाटन होऊन समाजात विज्ञान वाद रूजला असे त्या म्हणाल्या.
यावेळी श्री डोरले, श्रीमती पाटील यांनीही विचार मांडले.याप्रसंगी इंजिनियर पवन दवंडे यांचे समाज प्रबोधन कीर्तनामुळे श्रोते मंडळी मंत्रमुग्ध झाले.दरम्यान रिसिका चंपालाल साठवणे या चिमुकलीने नाटिका सादर केली.तत्पूर्वी शहरात रॅलीचे परिभ्रमण करून संत महापुरुषांचे विचार प्रसारित करण्यात आले.
संत जगनाडे महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.हा कार्यक्रम बहुजन समाज पक्ष आणि तेली समाज भाईचारा कमेटीच्या वतीने आयोजित करण्यात आला.संत जगनाडे महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाज जनजागरण अभियांनांतर्गत कही हम भुल न जाए! हे कार्यक्रम संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात आले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बसपाचे जिल्हा कोषाध्यक्ष आणि तेली समाज संस्थेचे संस्थापक संतोष खोब्रागडे यांनी अथक परिश्रम घेतले.प्रसंगी त्यांनी संचालन करून
आभार सचिन गणवीर यांनी मानले.