वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम
गोंदिया, दि.31 : वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्वाचे भरणपोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले आहे.
आज नविन प्रशासकीय इमारतीतील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी सभा आयोजित केली होती. सभेला मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कुलचे प्राचार्य भुवनकुमार बिसेन, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयातील फॅशन डिझायनींग डिपार्टमेंटच्या प्रमुख शाजीया शेख, सहायक जिल्हा माहिती अधिकारी कैलाश गजभिये व ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मंडपे उपस्थित होते.
सदर उपक्रमांतर्गत सामुहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा, तसेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग व सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची रचना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयातील प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक, जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल, जिल्हा माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य भुवनकुमार बिसेन यांच्या हस्ते होणार आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या वाचन पंधरवाड्यानिमीत्त 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत वाचन उपक्रम, ग्रंथप्रदर्शन हे कार्यक्रम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे राबविले जाणार आहेत.
वाचन पंधरवाड्यानिमीत्त सामुहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन व सदर कालावधीत अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमीत्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी केले आहे.