जिल्ह्यातील ग्रामपंचायती कडकडीत बंद

0
12
गोंदिया ः बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले अशा घटनांच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज आज, दि. ३१ डिसेंबरपासून २ जानेवारी बंद ठेवण्यात आले. आज, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज कडकडीत बंद होते. दरम्यान, या आंदोलनामुळे गावगाडा ठप्प पडला असून, अनेक नागरिकांची कामे प्रभावित झाली. गोंदिया जिल्हा सरपंच संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख ज्यांनी ग्रामपंचायतीला विकासकामांच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले, गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अशा सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा सरपंचावरील जीवघेण्या हल्याच्या दुसऱ्या घटनेने महाराष्ट्र हादरला. धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. लोकशाही तथा पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला गालबोट लावणाऱ्या अशा घटना तत्काळ थांबल्या पाहिजेत, यासाठी सरपंच संघटना आक्रमक झाली. संघटनेने या घटनांचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ३१ डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सरपंच व सदस्यांनी शंभर टक्के प्रतिसाद देत ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवले.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरपंच सुरक्षेसाठी शासनाने विशेष कायदा करावा, सरपंच व पदाधिकाऱ्यांना विमा संरक्षण देण्यात यावे, सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, मृत सरपंचाच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेधही केला.
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा पाठिंबा
महाराष्ट्र राज्य हा लोकशाहीयुक्त पुरोगामी राज्य असून अशा राज्यामध्ये सरपंचाची निर्घृणपणे हत्या होणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी सरपंच संघटनेने पुकारलेल्या कामबंद आंदोलनाला ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने पाठिंबा दिल्याचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी सांगितले.