वाशिम ,दि.८ जानेवारी – ६ जानेवारी २०२५ रोजी कोंडाळा झामरे येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वर एस यांचे हस्ते मग्ररोहयो अंतर्गत जलतारा कामाची भूमिपूजन करून जलतारा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विभागीय वन अधिकारी अभिजीत वायकोस , अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे,जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब दराडे, तालुका कृषी अधिकारी ,अतुल जावळे,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,जयप्रकाश लव्हाळे, सरपंच शिल्पाताई वाठोरे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांनी वाढीच्या विविधअवस्थेत असलेल्या चीया पिकाच्या पाहणी सुद्धा यावेळी केली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या पिकाच्या उत्पादन वाढीकरिता महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन त्यावर भर देण्यास सांगितले तसेच याची गुणवत्ता राखण्यासाठी यामधील मोहरी पिकाचे समुच्च निर्मूलन करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले गुणवत्तापूर्ण चिया सीड्स ची निर्मिती करून आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी असे त्या यावेळी म्हणाल्या. त्याचबरोबर कांदा बीज उत्पादन, फलोत्पादन,मधुमक्षिका पालन व शेतीपूरक उद्योगातून उन्नती साधण्याच्या दृष्टीने शेतमाल प्रक्रिया मार्केटिंग ब्रॅण्डिंग यावर भर दिल्यास शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे अर्थार्जण होण्याच्या दृष्टीने या बाबी खूप फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असेही यावेळी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी मत मांडले.
विभागीय वन अधिकारी अभिजीत वायकोस यांनी जिल्ह्यामध्ये होत असलेल्या चिया पिकासंदर्भात समाधान व्यक्त करत शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरिफ शहा यांनी चिया पिकाच्या जिल्ह्यातील वाटचालीबाबत सविस्तर वृत्तांत कथित केला. प्रास्ताविक महादेव सोळंके यांनी केले तर जयप्रकाश लव्हाळे यांनी सर्वांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या वतीने जगदीश देशमुख यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळ कृषी अधिकारी वाशिम एम.डी.सोळंके, कृषी पर्यवेक्षक नितीन ठाकरे,सिद्धार्थ गिमेकर, कृषी सहायक नितीन वाडेकर, राजुभाऊ ठाकरे, राजेश छत्रे, कु.सी.डी.तोटवाड , माधव झांबरे, दत्तात्रय बुंदे, जगदीश देशमुख या शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमास गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.