लोकसेवा हक्क: प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

0
16

भंडारा, दि. 31 : महाराष्ट्र लोकसेवा हक्का अधिनियम 2015 अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील सर्व विभागांसाठी आज विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान आपले सरकार पोर्टल, इन्स्पेक्शन फॉर्म , प्रथम व द्वितीय अपीलीय प्राधिकरण यांच्या कार्यप्रणालीसह विविध प्रपत्रे भरण्याची सविस्तर माहिती देण्यात आली.

           निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी  “आपले सरकार केंद्रचालक हे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा आहेत. नागरिकांना विहित मुदतीत सेवा पुरविणे हे केंद्रचालकांचे कर्तव्य आहे. सेवा न मिळाल्यास नागरिकांना अपील करण्याचा हक्क कायद्याने दिला आहे, असे सांगून प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व स्पष्ट केले.

         जिल्हा समन्वयक देवेंद्र निलकुटे  यांनी  महाआयटी महामंडळाच्या सहकार्याने युझर आयडी व पासवर्ड तयार करणे, तसेच पोर्टलवर प्रपत्र भरण्याच्या प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी प्रशिक्षणादरम्यान चित्रफितीद्वारे प्रात्यक्षिक दाखवले.यावेळी  जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उमेश घुगुसकर, सपोर्ट इंजिनियर सागर ठाकरे, कार्तिक आकरे, व इतर अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणात उपस्थितांना नागरिकांसाठी उपलब्ध सेवांची माहिती व त्याच्या वेळेत अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.कार्यक्रमादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.