गोरेगाव : जीर्ण इमारतीच्या वर्गखोलीत तब्बल चार वर्ग भरतात. अशातच वर्गखोलीचे स्लॅब कोसळून विद्यार्थी जखमी झाले. ही घटना आज, 2 जानेवारी रोजी गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथे घडली. सुदैवाने मोठी घटना टळली असली तरी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या जिल्हा परिषदेला जाग तरी कधी येणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथे जिल्हा परिषदची 1 ते 4 पर्यंत शाळा आहे. आज गुरुवारी (ता.2) दुपारी 3 वाजताच्या सुमारास विद्यार्थी वर्गात असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडला. त्यामुळे एक विद्यार्थी गंभीर, तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकाच खोलीत चार वर्गाचे विद्यार्थी शैक्षणिक धडे घेत आहेत. इयत्ता तिसरीचे 6 विद्यार्थी गणवेश पाहण्यासाठी आले असता अचानक त्यांच्या अंगावर स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी तर 3 किरकोळ जखमी झाले.लगेच जखमी विद्यार्थ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र कुऱ्हाडी येथे औषधोपचारासाठी नेण्यात आले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत 20 वर्षांपूर्वी साईटला येथील वर्ग खोलीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारत जीर्ण झाल्यासंदर्भात अनेकदा शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली होती. पण शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन वर्गात बसत आहेत. यातच आज गुरुवारी मोठी घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही मोठी हानी झाली नाही.या घटनेनंतर स्थानिक पालकांनी उद्या 3 जानेवारी रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.