गोंदिया,दि.०३ः– जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या नवेगाव बांध परिसरात उभारण्यात आलेल्या MTDC रिसॉर्टचे काम पूर्ण झाले असून, लवकरच या प्रकल्पाचे भव्य लोकार्पण जानेवारी महिन्यात करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.अजुनी/मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी या प्रकल्पाला विशेष पाठिंबा दिला असून, त्यांनी पर्यटन विभागाला लवकरात लवकर लोकार्पणाचा कार्यक्रम निश्चित करण्याची विनंती केली आहे. यामुळे नवेगाव बांधाच्या प्रसिध्दीला प्रोत्साहन मिळेल आणि जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी नवा अध्याय सुरू होईल.
राज्याच्या पर्यटन धोरणाला नवे संजीवनी
या प्रकल्पाच्या माध्यमातून नवेगाव बांध अभयारण्य आणि परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. निसर्गरम्य वातावरणात उभारलेल्या या रिसॉर्टमुळे पर्यटकांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
पर्यटन क्षेत्राला नवे क्षितिज
MTDC रिसॉर्टच्या स्थापनेमुळे नवेगाव बांध हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. पर्यटकांना दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
राज्याच्या पर्यटनासाठी ऐतिहासिक क्षण
राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारा हा कार्यक्रम स्थानिक आणि राज्य पर्यटनाला चालना देणारा ऐतिहासिक क्षण ठरेल. लोकार्पण सोहळ्यासाठी तारीख आणि वेळ लवकरच जाहीर होईल.