चंद्रपूर : विदर्भातील सर्वात मोठ्या गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी आज ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या भागात येत्या काळात पाच साखर कारखाने येतील. तसेच लवकरच शेतकऱ्यांना मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे दोनदा उत्पन्न घेणे सहज शक्य होणार आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तसेच नकद नफा मिळण्याकरिता कृषी विभागाने आगामी हंगामात शेतकऱ्यांना बदलत्या पीक पद्धतीचे महत्त्व पटवून देत मका व ऊस लागवडीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांची संवाद साधावा असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत दिले.
आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या शेतकऱ्यांकरिता असलेल्या जनकल्याणकारी योजना, व इतर महत्त्वपूर्ण बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्यात नव्याने राबविण्यात येणाऱ्या पोकरा योजनेअंतर्गत अधिकाधिक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. तर शेतकऱ्यांना गोसेखुर्दचे पाणी शेतीपर्यंत मुबलक प्रमाणात मिळत असल्याने आगामी काळात या क्षेत्रामध्ये पाच साखर कारखाने प्रस्तावित करण्याचा कारखानदारांचा दृष्टिकोन असून दुबार उत्पन्न घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांना मका व ऊस लागवड करिता प्रवृत्त करावे. जेणेकरून येथील शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव व परिसरातील नागरिकांना रोजगार असा दुहेरी फायदा होईल असेही ते यावेळी म्हणाले. तर सध्या एमआयडीसी मुल येथे इथेनॉल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून मका व धान यातून इथेनॉल निर्मिती होणार आहे. याकरिता कच्चामाल म्हणून मका व धान अधिकाधिक प्रमाणात लागणार असून दर्जानुसार शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे. तर बदलत्या पीक पद्धतीनुसार शेत जमिनीचा पोतही सुधारत असून शेतकऱ्यांनी बदलती पीक पद्धती अवलंबून नगद नफा देणारे मका व ऊस पिकाची लागवड करावी. यासाठी कृषी विभागाने ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी व क्षेत्रात शेतमालावर आधारित रोजगार उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली.