गोंदिया : तालुक्यातील कामठा येथील क्रिडा संकूलात उभारण्यात आलेले सोलर हायमास्ट लाईटचे खांब कोसळला. दरम्यान मैदानात खेळ असलेला एक विद्यार्थी खांबाखाली आल्याने जखमी झाला. ही घटना (ता.७) दुपारी ३.३० ते ४ वाजता सुमारासची आहे. आर्यन महेंद्र मेंढे (१५) रा.छिपीया असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. जखमी विद्यार्थ्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने विकासकामांची पोलखोल झाली आहे. कामठा येथील क्रीडा संकूलात काही महिन्यांपूर्वीच सोलर हायमास्ट लाईलचे खांब उभारण्यात आले आहेत.
या खांबावर सोलर प्लेट लावून कंत्राटदाराने काम फत्ते केले. आज (ता.७) दुपारी ३ ते ४ वाजता सुमारास मैदानात क्रीडा सराव करण्यासाठी खेळाडू व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आले. जीईएस हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आर्यन महेंद्र मेंढे (१५) हा खांबापासून काही अंतरावर सराव करीत होता. दरम्यान अचानक सोलरप्लेट लागलेला खांब कोसळला. याच्यात आर्यन सापडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून तो जखमी झाला. या घटनेने क्रिडा संकूलात एकच धावपळ सुटली. दरम्यान उपस्थितांना मदतकार्य करीत आर्यन मेंढे याला त्वरित रूग्णालयात हलविले.
तर याची माहिती क्रीडा संकूल प्रशासनाला देण्यात आली. घटनेतील जखमी आर्यन मेंढे हा गोंदिया येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असून डॉक्टरांनी दोन ते अडीच लाखाचा खर्च सांगितला आहे. विद्यार्थ्यांचे पालकाची आर्थिक भुर्दंड पेलण्यास सक्षम नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. यामुळे प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच उपचाराचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्याच्या पालकांना देण्यात यावा, अशी मागणी महेंद्र मेंढे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
निकृष्ट बांधकामाची पोलखोल
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तालुका क्रीडा संकूलामध्ये मोठा निधी खर्चून सौर हायमास्ट लाईट लावण्यात आले. याच्यासाठी मेटा नावाच्या एका एजंन्सीला कंत्राट देण्यात आले. या कंपनीचे दुसर्या कंत्राटदाराच्या माध्यमातून कामे करवून घेतली. दरम्यान कामाला ८ ते १० महिने लोटले असून आज उभारण्यात आलेला खांब कोसळून विद्यार्थी जखमी झाला. या घटनेमुळे निकृष्ट बांधकामाची पोलखोल झाली असून कोणत्या स्तरापर्यंत विकासकामे केली जात आहे, याचे पितळ उघडे पडले आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराने फक्त दोन नट-बोल्ट उपयोगात आणून सौर हायमास्ट लाईटचे खांब उभारले होते.