गोंदिया,दि.११ःगोंदिया जिल्हा परिषदेच्या पुढील अडीच वर्षाकरीता अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जाहीर केला असून येत्या २४ जानेवारीला नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाकरीता भाजपचे जि.प.गटनेते लायकराम भेंडारकर,डव्वा गटाचे सदस्य डाॅ.भुमेश्वर पटले,मुंडीपार गटाचे सदस्य डाॅ.लक्ष्मण भगत,सेजगाव गटाचे सदस्य पवन पटले,किशोर महारवाडे,श्रीमती रचना गहाणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
जिल्हा परिषदेत सध्या भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.त्यातच विधानसभा निवडणूक काळात गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेचे सर्व सदस्य भाजपमय झाल्याने आत्ता भाजपची संख्या वाढली आहे.त्यामुळे उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पद नको अशी भूमिका भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली असून निवडणूकीच्या दिवशी काय घडते याकडे लक्ष लागले आहे.
यापुर्वी गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक 10 मे २०२२ रोजी पार पडली होती.या पदाधिकार्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २४ मध्येच संपला,मात्र विधानसभेच्या निवडणूका असल्याने मुदतवाढ देण्यात आली होती.53 जागांपैकी भाजपने 26 जागा जिंकल्या. मॅजिक फिगर गाठण्यासाठी 1 सदस्यांची गरज होती. अपक्ष उमेदवारी लढलेले पोर्णिमा ढेंगे, सोनू कुथे यांनी भाजपला समर्थन दिले होते.आत्ता दोन्ही अपक्ष भाजपचे सहकारी झाले आहेत.
गोंदिया झेडपीत असे आहे बलाबल
53 जागांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्यापैकी 26 जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेस 13, चाबी 4, राष्ट्रवादी 8,अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे.आता भाजप २६,चाबी ४ व अपक्ष २ मिळून ३२ चा आकडा झालेला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करुन घ्यायला भाजप जिल्हा परिषद सदस्यांनी जोरदार विरोध सुरु केला आहे.