अल्पवयीन मुलांना दुचाकी दिल्यास पालकांना दंड व शिक्षा

0
221

वाहतुक विभागाने जारी केले पत्र 
गोंदिया : जिल्ह्यात मागील वर्षभरात दीडशे पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांच्या घटनांमधून अल्पवयीन शाळकरी मुले विनापरवाना दुचाकी चालवीत असल्याचे समोर आले आहे. या अनुषंगाने शहरातील सर्व शाळांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना वाहतूक शाखेने पत्र पाठविले आहे. पत्राच्या माध्यमातून मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांना सावधगिरीचा ईशारा पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन मुलाला दुचाकी दिल्यास 3 महिने कैद व 25 हजाराचा दंड पालकांना ठोठावण्यात येणार असे पत्रात नमूद आहे. वाहतुक शाखेने जारी केलेला पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारीत झाला असून पत्राची जोरदार चर्चा आहे.
शहरात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन शाळकरी मुले दुचाकी चालवित असल्याचे लक्षात आल्याने वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी शाळेच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच पत्र लिहून पालकांमध्ये जागृती करण्याचे आवाहन केले. अन्यथा पालकांना 3 महिने कैद, 25 हजार रुपयाचा दंडाचा सामना करावा लागू शकतो असेही पत्रात नमूद आहे. शाळांना हे पत्र मिळताच शाळांमधून आता प्रत्येक मुलांच्या पालकांना संदेश पाठवून त्यांच्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यासाठी देऊ नका, असे कळकळीचे आवाहन केले जात आहे. शहर व जिल्ह्यात अलिकडे अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासणीत गोंदियातील रस्त्यांवर अनेक शाळकरी अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असल्याचे उघड झाले आहे. 7 व्या वर्गापासून ते 12 व्या वर्गापर्यंतची मुलेही रस्त्यावर भरधाव दुचाकी चालवित असतात. अनेक जण शिकवणी वर्गाला जाण्यासाठी थेट दुचाकीचाच वापर करीत आहेत आणि पालक देखील कुठल्याही गोष्टीची काळजी न करता अल्पवयीन पाल्याच्या हाती दुचाकी सोपवून मोकळे होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शाळेमधून पालकांना मोबाईलवर संदेश येऊ लागले आहेत. अल्पवयीन शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी वाहतूक शाखेच्या मोहीमेचे कौतूक होत आहे.

अल्पवयीन मुले वाहने चालविताना निदर्शनास येत आहेत. या मुलांना वाहतुकीचे कोणतेही नियम माहीत नसतात. अशा प्रकारे वाहने चालविताना आढळल्यास वाहन मालक/पालकाला 25 हजार रुपये दंड आणि 3 महिने कैदेची शिक्षा होणार आहे. त्यामुळे वाहन मालक किंवा पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नये.
नागेश भास्कर, पोलिस निरीक्षक, जि. वाहतूक शाखा गोंदिया.