गोंदिया,दि.१५ःतालुक्यातील आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येत असलेला इर्री-नवरगाव(खुर्द)या रस्त्याचे काम सुरू होऊन १४ महिन्यांचा कालावधी लोटला,तरीही रस्त्याचे बांधकाम अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.त्यामुळे या रखडलेल्या रस्त्याचे बांधकाम त्वरित सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी रविशंकर तरोणे यांनी केली आहे.या मतदारसंघातील नागरिकांना गोंदिया जिल्हा व तालुकास्थळी जाण्याकरीता हा एकमेव मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात आवागमन आहे.रस्त्याचे काम संथगतीने होत असल्याने ये-जा करणारे नागरिक,विद्यार्थी,शेतकरी व इतर व्यवसाय करणार्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्यावर अनेकदा अपघात झाले असून पुढेही नाकारता येत नाही.एखादा मोठा अपघात घडून जिवितहानी झाल्यास विभागाचे अभियंता व कंत्राटदारालाच जबाबदार ठरविण्यात येईल असेही श्रीमती तरोणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.कामाची गुणवत्ता सुध्दा योग्य नसल्याने आत्तापासूनच वापरण्यात आलेली गिट्टी बाहेर निघण्यास सुरवात झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.त्यामुळे चांगल्या दर्जाचे बांधकाम करुन रस्ता त्वरित वाहतुकीकरीता उपलब्ध करुन देण्याची मागणी तरोणे यांनी केली आहे.