या महिला सहकारी बँकेत लाखोंचा गैरव्यवहार

0
55

अमरावती,दि.१५ःअमरावती जिल्हा महिला सहकारी बैंक लि. अमरावती द्वारा संचालित अचलपूर शाखेत खोटे दस्तावेज(documents)सादर करून बँकेशी कुठलाही संबंध नसलेल्या अचलपूर-परतवाडा शहरातील बेरोजगार युवक, व्यावसायिक व शिक्षकांच्या नावे लाखो रूपयांचे कर्ज परस्पर उचलल्या गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अनेकांनी अचलपूर शाखेत धाव घेत पोलिसांतही तक्रार (complaint)नोंदविली आहे. याबाबत पोलिस प्रशासन व जिल्हा महिला सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आर्थिक गैरव्यवहाराबाबत दुजोरा दिला असून तपासानंतर योग्य ती बाब पुढे येईल, असे सांगितले आहे. बँकेतून कर्ज (Loan)वाटप करत असताना ज्यांच्या नावे कर्ज वितरीत करण्यात आले, ती व्यक्ती बँकेत रक्कम काढण्यासाठी आलीच नाही. अनेकांना तर आपल्या नावे कर्ज उचल केल्याची माहिती बँकेतून फोन व नोटीस प्राप्त झाल्यानंतर झाली आहे. काही बेरोजगार युवकांचे दस्तावेज घेऊन कर्ज मिळवून देत असल्याचे सांगत कर्ज प्रकरण मंजूर प्रक्रियेसाठी जमानतदारांच्या जोडलेल्या दस्तावेजांचा वापर करुन जमानतदारांच्या नावावरही कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विशेष म्हणजे ज्यांनी कर्जासाठी दस्तावेज दिले, त्यांचे कर्ज मंजूर करत त्या व्यक्तीला न सांगता लाखोंची रक्कम परस्पर काढल्याचा प्रकारही पुढे आला आहे. फसवणूक झालेल्या तक्रारदारांचे म्हणने आहे की, सिव्हील लाईन निवासी रघुनंदन ऊर्फ बाल्या उपाध्याय यांनी जिल्हा महिला सहकारी बँकेतून कर्ज मिळून देतो, असे सांगून आधारकार्ड, पॅनकार्ड, तीन वर्षाचे आयकर रिटर्न, विद्युत बिल व चेक असे दस्तावेज जमा करून कर्ज मिळवून देत असल्याचे सांगितले. कर्ज वितरीत करताना दोन लक्ष रुपयांचे कर्ज मंजूर करून हातात १ लाख ७० हजार दिल्या जाईल. उर्वरित रक्कम कमीशन स्वरुपात खर्च होईल.

तसेच दरमहा ५ हजार रुपये बँकेत भरावे लागतील, असे सांगून हा प्रकार करण्यात आला. अख्खी रक्कम परस्पर खात्यातून काढण्यात आली. शहरातील जवळपास २५ ते ३० जणांच्या नावावर हे कर्ज मंजूर करून घेताना ते शाळेतील शिक्षक म्हणून शासकीय नोकरीवर असल्याचे खोटे दस्तावेज जोडण्यात आले. हा सर्व प्रकार उपाध्याय यांच्या माध्यमातून बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने करण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. बैंक व्यवस्थापक भूषण संके यांनी माहिती देताना म्हटले की, उपाध्याय यांनी दस्तावेज सादर केल्याप्रमाणे हे कर्ज प्रकरणे मंजूर करत विड्राल रक्कम उपाध्याय यांना दिली त्यांनी खोटे दस्तावेज देऊन बँकेची फसवणूक केली, असे म्हटले आहे, तर दुसरीकडे रघुनंदन उपाध्याय यांनी म्हटले आहे की, ज्या तक्रारदरानी माझ्या माध्यमातून कर्ज प्रकरणे मंजूर केल्यानंतर शाखा व्यवस्थापकाने रक्कम स्वतःकडे जमा ठेवली.

मात्र या आरोप प्रत्यारोपात बँकेचे कर्ज न घेणाऱ्यांच्या नावे कर्जाची उचल झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली असून फसवणुकीचा हा प्रकार गंभीर आहे. याबाबत अमरावती बँकेच्या वरिष्ठांनी बँकेतील सर्व संशयित कर्ज प्रकरणे तपासणीसाठी अमरावती येथे नेले आहेत. लवकरच याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.