अकोला :- ‘कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या(Technology) वापरातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात ‘कृषी अभियांत्रिकी संचालनालय’ स्थापन होण्याची चिन्हे आहेत.
याबाबत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी (Farmer)कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच राज्यांना कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री देवेश चतुर्वेदी यांनी याबाबत सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्रातून सूचित केले आहे. ‘कृषी यांत्रिकीकरण आणि कृषी प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर कृषी अभियंता पदांची निर्मिती करून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे सोपे होईल. हे कार्य कृषी अभियांत्रिकी संचालनालयाच्या माध्यमातून अधिक सुकर होईल, असे पत्रात नमूद केले आहे.
देशभरात कृषी अभियंतापद निर्मितीस केंद्र आग्रही
दरम्यान, कृषी अभियंते सिंचन, मृदा आणि जलसंधारण, पीक उत्पादन, कापणी आणि प्रक्रिया, कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचे आरेखन-निर्मिती आणि ऊर्जा व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत काम करतात, ते कृषी उद्योगातील उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तंत्रे विकसित आणि लागू करण्यासाठीदेखील कार्य करतात. महाराष्ट्रात सरकारने राबवलेल्या अनेक कृषी योजनांमध्ये कृषी अभियंत्यांची गरज भासते. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना इत्यादींचा समावेश आहे.