गोंदिया, दि.15 : आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिध्द आहे. सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत यात्रा होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी पुर्वतयारी आढावा घेतला.
सभेला निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, सालेकसा तहसिलदार एन.एम.कोंडागुर्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, कोसमतर्रा सरपंच सिंधु घरत यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कचारगड देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम म्हणाले, कचारगड यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत अखंडीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी. वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था सुनिश्चित करावी, औषधांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा. आरोग्य पथकाची व्यवस्था करण्यात यावी. गृह विभागाने कंट्रोल रुम तयार करुन डिस्प्ले करावे. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात यावे. गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करावे. भाविकांसाठी निवास व्यवस्था व शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात यावी. अन्न व औषध विभागाने प्रसाद/अन्न तपासणी करावी. यात्रेदरम्यान भाविकांनी प्लास्टीकचा वापर करु नये. व्हालंटिअर्सला ड्रेसकोड देण्याची व्यवस्था करावी. यात्रे दरम्यान एस.टी.महामंडळाने बसेसची व्यवस्था करुन वेळापत्रक जाहीर करावे. भोजनदानामध्ये शिळ्या अन्नाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. नगर परिषदेने अग्नीशमन वाहनाची व्यवस्था करावी. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात यावी. अनुचित घटना घडू नये यासाठी गॅस सिलेंडर बाबत दक्षता घेण्यात यावी. यात्रेला व्हीव्हीआयपी अतिथी आले तर गैरसोय होऊ नये म्हणून हेलिपॅडची व्यवस्था करुन ठेवावी. यात्रे दरम्यान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून कामे करावीत. सदर बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांचे यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.