डव्वा गावातील विटभट्टीवर जाऊन बालकांच्या लसीकरणाची घेतली माहिती

0
328

गोंदिया, दि.15 : गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा उपकेंद्राला भेट देत तिथे सुरु असलेल्या नियमित लसीकरण सत्राची जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी पाहणी केली.सत्रादरम्यान आरोग्य सेविका,आशा सेविका, अंगणवाडी सेविका,आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते.माता व बाल संगोपन कार्यक्रम अंतर्गत आरोग्य विभागामार्फत दिले जात असणारे लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे की नाही याची तपासणी केली.तसेच एक वर्षांच्या आत बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण होणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते.त्यामुळे पालकांनी आपल्या बालकास जवळच्या आशांमार्फत लसीकरण सत्रात जावुन लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत यांनी केले आहे.
आरोग्य विभागामार्फत गावपातळीवर प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येते.लोकांनी जबाबदारीने आपले बालकांचे संपुर्ण लसीकरण शासकिय रुग़्णालयात करुन आपल्या बालकास कुपोषण व गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारे प्रतिकार शक्ती निर्माण करावे.जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी,हिपॅटायटीस-बी,पोलिओ, पेंटाव्हँलंट,रोटा व्हायरस,पीसीव्ही,आयपीव्ही,गोवर-रुबेला,जेई,डिपीटी,व्हिटँमिन-अ डोज ई.विविध लसीकरण मोफत दिले जात आहे.भेटी दरम्यान डॉ.रोशन राऊत यांनी हिरडामाली उपकेंद्र लगत असलेल्या डव्वा गावातील विटाभट्टी ठिकाणाला भेट देवुन तेथील कुटुबांशी संवाद साधुन त्यांच्या घरातील बालकांना लसीकरण झाले की नाही याची शहानिशा केली.तसेच तेथील अंगणवाडी केंद्राला भेट देवुन बालकांचे वजन व उंची मोजुन पडताळणी केली.
कुपोषण रोखण्यासाठी वजन कमी असलेल्या बालकांना पोषण पुनर्वास केंन्द्र(एन.आर.सी.)हा सर्वोत्तम उपाय आहे.या केंद्रात एक महिन्यापासून पाच वर्षांच्या वजन कमी असलेल्या बालकांना भरती उपचार केले जातात. या केंद्रांमध्ये मुलांना वैद्यकीय आणि पोषणाच्या उपचारांची सोय केली जाते. याशिवाय मुलांना वेळेवर, योग्य आणि पुरेसे अन्न देण्यावर भर दिला जातो. या केंद्रांमध्ये आई आणि देखरेख करणाऱ्यांना मुलांची योग्य देखरेख आणि पोषण करण्याच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत केली जाते.
भेटीत ग्रामपंचायत डव्वा येथे भेट देवुन ब्लिचींग साठा व नोंदीची पडताळणी करुन गावातील सर्व पिण्यायोग्य स्त्रोतांचे जलसुरक्षक व आरोग्य सेवक यांच्या समन्वयाने पाणी नमुने तपासणी नियमित करण्यापाठोपाठ गावात किटकजन्य व साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सुचना दिल्या.भेटी दरम्यान त्यांचे सोबत गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण, तालुका आरोग्य सहाय्यक रवि पटले उपस्थित होते.