‘प्रधानमंत्री-सूर्यघर’ योजनेतून नागपूर परिमंडल प्रकाशमान

0
309
  • नागपूर, वर्धा जिल्ह्यातील 18,355 घरांवर 73.27 मेगावॅट ऊर्जा निर्मिती
  • राज्यातील एकूण सौरऊर्जा प्रकल्पांपैकी एकट्या नागपूर परिमंडलात 19.99 टक्के प्रकल्प
  • केंद्र शासनातर्फे आकर्षक अनुदान

 नागपूरदि. १५ जानेवारी: – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत नागपूर परिमंडलात आतापर्यंत 18 हजार 355 वीजग्राहकांनी त्यांच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून, त्यांची स्थापित वीजनिर्मिती क्षमता 73.27 मेगावॅट आहे. तर याच योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या परिमंडलातील 21 हजार 827 ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्याचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 91 हजार 877 सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांपैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात तब्बल 19.99 टक्के प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक  किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. महावितरणने नुकताच या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे परिमंडलातील लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविलेल्या एकूण 18 हजार 355 ग्राहकांपैकी नागपूर शहर मंडलातील 13 हजार 945, नागपूर ग्रामिण मंडलातील 1 हजार 942 तर वर्धा मंड4 हजार 468 ग्राहकांचा समावेश असून त्यात विदर्भातील प्रथम ‘सौरग्राम’ ठरलेल्या हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट -राठी या गावाचा देखील समावेश आहे.  त्यांची स्थापित वीजनिर्मिती क्षमता नागपूर शहर मंडलात 56.6 मेगावॅट, नागपूर ग्रामिण मंडलात 7.43 मेगावॅट तर वर्धा मंडलात 9.24 मेगावॅट आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत नागपूर परिमंडलात एकूण 21 हजार 827 ग्राहकांकडील घरावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार असुन. यात सर्वाधिक नागपूर शहर मंडलातील13 हजार 162 ग्राहक असून नागपूर ग्रामीण मंडलात 2 हजार 788 ग्राहक आहेत तर वर्धा मंडलात  5 हजार 877 ग्राहकांचा समावेश आहे. लवकरच या ग्राहकांच्या घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प वीज निर्मितीसाठी सज्ज असणार आहेत.

तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी महावितरणने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. परिमंडलातील जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. .

मंडनिहाय आकडेवारी

मंडळ                                     ग्राहक           स्थापित क्षमता (मेगावॉट

नागपूर शहर                        13,945                  56.6

नागपूर ग्रामिण                      1,942                    7.43

वर्धा                                 2,468                     9.24

नागपूर परिमंडल एकूण         18,355                 73.27