गोंदिया, दि.20 : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने गोंदिया ग्रंथोत्सव-2024 चे आयोजन 20 व 21 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले असून त्यानिमित्ताने आज नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे सकाळी 9.30 वाजता ग्रंथपूजन करुन ग्रंथदिंडीचे अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते विधीवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी ग्रंथालय संचालक मुंबई अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक नागपूर रामदास साठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा, सचिव डी.डी.रहांगडाले, सदस्य विनायक अंजनकर, मनोहर म्युन्सीपल हायस्कुलचे प्राचार्य भूवनकुमार बिसेन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाश्री कांबळे व ग्रंथालय निरीक्षक अस्मिता मनपे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी आंबेडकर चौक, गोंदिया येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिमच्या तालात ग्रंथदिंडी ही आंबेडकर चौक येथून निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा-नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी प्रतिमा अशी मार्गक्रमण करुन श्री शारदा वाचनालय येथे ग्रंथदिंडीचे समापन करण्यात आले. या ग्रंथदिंडीस गोंदिया शहरातील नागरिकांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.