मुख्यमंत्र्यांच्या कृती कार्यक्रमांतर्गत माहिती संचालक डॉ.गणेश मुळे यांनी साधला माध्यमांशी संवाद

0
41

गोंदिया, दि.22 : शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने 100 दिवसाचा कृती कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.  त्या अनुषंगाने आज नागपूर- अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ.गणेश मुळे यांनी गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाला भेट देवून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची असून शासनाच्या या उपक्रमाला प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिध्दी देऊन सर्वतोपरी सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलदगतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय विभागांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही शासकीय ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी प्रसारमाध्यम हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे शासनाच्या ध्येयधोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिध्दी द्यावी, असे आवाहन नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

          डॉ.गणेश मुळे म्हणाले, राज्य सरकारने अनेक विकासकामे होती घेतली आहेत. सामान्य लोकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि तत्परतेने मिळाव्यात यासाठी देखील पाऊले उचलली आहेत. सदर योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. पहिल्या 100 दिवसात नागपूर विभागात सुध्दा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा (आर्टिफिशल इंटलिजन्स) वापर करुन अधिक जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी  प्रसारमाध्यमात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी आर्टिफिशल इंटलिजन्सचे प्रशिक्षण सुध्दा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

         यावेळी जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे, उपसंपादक कैलाश गजभिये, पत्रकार सर्वश्री चंद्रकांत खंडेलवाल, अतुल दुबे,खेमेंद्र कटरे, जयंत शुक्ला,संजय राऊत, रवि सपाटे, दिनेश भगत उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी श्वेता पोटूडे यांनी मानले.