गोंदिया,दि.२३ः- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी जिल्ह्यातील नोंदणीकृत हत्तीपायरोग ग्रस्त रुग्णांना विकृती व्यवस्थापन आणि अपंगत्व प्रतिबंध(एम.एम.डी.पी.)किट मोफत वितरीत करण्यात येते.ह्यावर्षी जिल्ह्यातील 666 हत्तीपायरोग ग्रस्त रुग्णांकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राना एम.एम.डी.पी.किटचे वितरण करण्यात आल्याची माहीती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे.जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये फायलेरिया क्लिनिक कार्यरत असुन तिथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक यांचे मार्फत हत्तीपायरोग ग्रस्त रुग्णांना विकृती व्यवस्थापन आणि अपंगत्व प्रतिबंध (एम.एम.डी.पी.)किट वापराबाबतचे आरोग्य सेवा व प्रशिक्षण दिले जात आहे.
प्रातिनिधिक हत्तीपाय आजारामुळे रुग्णाला जीवन ओझं वाटते.हे महत्त्वाचे आहे की रुग्णांना बाधीत हत्तीपायग्रस्त अवयवांचे व्यवस्थापन कसे करावे आणि ते त्यांच्या दैनंदिन जिवनाचा भाग बनवावे हे माहीत असणे आवश्यक आहे.हत्तीपाय निर्मूलन मोहिमेबाबत जिल्ह्यातील आरोग्य विभाग सतर्क आहे.जिल्हा फायलेरीया मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे.ग्रामीण भागातील हत्तीपायग्रस्त रुग्णांच्या शरीराच्या प्रभावित अवयवांची चांगली काळजी घेण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी रुग्णांना विकृती व्यवस्थापन आणि अपंगत्व प्रतिबंध एमएमडीपी किट प्रदान केले.सर्व रुग्णांना किट प्रदान करताना वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचार्यांनी रुग्णांना त्यांना बाधित झालेल्या अवयवांची काळजी घेणे आणि आवश्यक औषधी नियमित वापरण्याबाबत माहिती दिली जात आहे.एम.एम.डी.पी. किट मध्ये डेटॉल,साबण आणि अँटीसेप्टिक क्रीम अशा विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश असुन बाधीत अवयव निर्जतुंक करुन स्वच्छ्ता ठेवल्यास रुग्णांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील आणि त्यांची काळजी घेण्यास मदत करते.नियमित व्यायामामुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारेल असे नाही तर शरीराच्या प्रभावित भागावरील सूज देखील कमी होईल.
यासोबत आरोग्य विभागाने सर्व लोकांना फायलेरिया पासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या घरातील व आसपासच्या लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वुचेरेरिया बॅक्रोफटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो आणी त्याचा प्रसार क्युलेक्स क्विंक्वीफेशिएटस या डांसामार्फत होतो. त्यांचे प्रजनन घाण व प्रदुषित पाण्यात होते. तरि सर्व लोकांनी जनजाग्रुतीने डासोत्पती स्थाने नष्ट करावे व घाण पाण्याचा निचरा व्यवस्थित होइल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.लोकांनी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्य असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
हत्ती रोगाचा प्रसार डासांमार्फत होतो. दूषित व्यक्तीस डास चावला असता त्याच्या शरीरातील मायक्रो फायलेरिया रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरात त्याची वाढ व विकास होऊन ते संसर्गक्षम बनतात. डासांच्या सोंडेतून असा डास निरोगी माणसाला चावला कि त्या संसर्गक्षम सुक्ष्म अळ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. माणसाच्या शरीरात प्रवेश होताच त्या सूक्ष्म अळ्या लसीका वाहिनीत प्रवेश करतात आणि साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीत परिपक्व होतात. लसिका वाहिनीत प्रवेश करताच कालांतराने पायाला सूज होऊन त्यांची वाढ होते. डासांवर नियंत्रण , घाण नालिचे पाण्याचे नियोजन व मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्य असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
हत्तीरोगाचा प्रसार हा संसर्गग्रस्त मादी क्युलेक्स डास चावल्याने होतो आणि त्याच प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे.